विचारेंचे भागवतांपुढे ‘नमस्ते सदा वत्सले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:51 AM2018-10-27T00:51:08+5:302018-10-27T00:51:16+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे एका खाजगी कार्यक्रमासाठी ठाण्यात आले असताना शिवसेनेचे खा. राजन विचारे यांनी त्यांची भेट घेतली.

 The 'Namaste Sada Vatsale' | विचारेंचे भागवतांपुढे ‘नमस्ते सदा वत्सले’

विचारेंचे भागवतांपुढे ‘नमस्ते सदा वत्सले’

googlenewsNext

ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे एका खाजगी कार्यक्रमासाठी ठाण्यात आले असताना शिवसेनेचे खा. राजन विचारे यांनी त्यांची भेट घेतली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वबळाचा नारा देत असताना विचारे यांनी भागवतांची भेट घेतल्याने या भेटीमागे आगामी लोकसभेचे अवघड गणित सोपे करणे, हा हेतू असल्याची कुजबुज सुरू झाली आहे.
चरई भागात वास्तव्यास असलेल्या महेश जोशी यांच्या वास्तुपूजेसाठी शुक्रवारी सकाळी भागवत आले होते. तब्बल नऊ तास ते त्यांच्या घरी होते. याच कालावधीत विचारे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भागवत हे माझ्या घराजवळील भागात आल्याने त्यांची भेट घेतली, असे विचारे सांगत असले, तरी या भेटीमागे निवडणुकीचे गणित आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला युती हवी आहे. मात्र, पक्षप्रमुख स्वबळाचा नारा देत आहेत. सेना-भाजपा स्वतंत्र लढले, तर पुन्हा वर्चस्वाची लढाई असेल. मागील निवडणुकीत मोदीलाटेत विचारे हे लोकसभेत गेले. यावेळी मोदीलाटेचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे युती झाली, तरी विचारे यांच्यासमोर आव्हान आहे. समजा, युती झाली नाही तर विनय सहस्रबुद्धे यांचा सामना विचारे यांना करावा लागेल. कदाचित, अन्य पक्षांतून एखादा उमेदवार भाजपा आयात करील. युती झाली तरच विचारेंचा विजय निश्चित मानला जात आहे.
>सेना-भाजपची युती झाली नाही, तर त्यांनी आमदारकी लढवण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीत लाखोंच्या मताधिक्याने ते विजयी झाले होते. आता आगामी निवडणुकीचे गणित सोपे करण्याकरिता विचारे यांनी विचारपूर्वक मोहन भागवतांची भेट घेतल्याचे सेनेच्या वर्तुळात बोलले जात आहे.
>शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीकरिता भाजपावरील दबाव वाढवण्यासाठी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे ठाकरे यांचा एखादा निरोप देण्याकरिता विचारे यांनी भागवत यांची भेट घेतली का, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.
> सरसंघचालक मोहन भागवत हे माझ्या विभागात मित्राच्या घरी आले असल्याने मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. ही राजकीय भेट नव्हती. ते एक हिंदुत्वनिष्ठ आहेत आणि मीसुद्धा हिंदुत्वनिष्ठ असल्याने त्यांना भेटलो.
- राजन विचारे, खासदार, शिवसेना

Web Title:  The 'Namaste Sada Vatsale'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.