बँकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली ठाण्यातील दोन महिलांनी केली ३७ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 08:59 PM2018-01-18T20:59:11+5:302018-01-18T21:07:21+5:30
बॅकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली दोन महिलांनी चरईतील महिलेकडून ३७ लाख ८५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. अशाच प्रकारे यापूर्वीही त्यांनी अनेकांची फसवणूक केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
ठाणे: बँकेत मोठया पदावर नोकरीला असल्याचे भासवून दोन महिलांनी ठाण्याच्या चरईतील एका महिलेच्या नातेवाईकांना नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून ३७ लाख ८५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जयश्री मोहिते (६०) आणि मेघा कदम (३४) या दोन महिलांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे पश्चिम भागातील चरई येथे वास्तव्यास असलेल्या तृप्ती परब यांना मोहिते आणि कदम या दोन महिलांनी परब यांना बॅकेत असल्याची बतावणी केली. परब यांचे पती, नणंद आणि भाऊ यांना कॅनरा बँकेत नोकरीला लावण्याचे अमिष दाखवत त्यांनी सुरुवातीला त्यांच्याकडून ८५ हजार रुपये घेतले. विश्वास संपादन होण्यासाठी त्यांनी हे पैसे बॅकेत आॅनलाईनद्वारे वळते केले. पुढे हे काम होण्यासाठी मोठया अधिकाºयांनाही पैसे द्यावे लागतील अशी बतावणी करीत त्यांच्याकडून पुन्हा प्रत्येकासाठी ५० हजार ते तीन लाखांची रक्कम घेतली. कालांतराने या दोघींनीही त्यांना आपल्या घरी बोलवून पुन्हा लाखाच्या पटीत रकमा घेतल्या. यातील काही रकमा रोख तर काही धनादेशाद्वारे घेतल्या. २७ जानेवारी २०११ ते ७ आॅक्टोंबर २०१३ या काळात त्यांनी परब यांच्या नातेवाईकांना बँकेत लावण्यासाठी ३७ लाख ८५ हजार रुपये घेतले. इतकी रक्कम घेऊनही तिघांपैकी कोणालाही त्यांनी बॅकेत नोकरी लावली नाही. परब कुटूंंबियांनी या दोन्ही महिलांची चौकशी केल्यानंतर दोघींपैकी कोणीही बॅकेत नोकरीला नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळेच या कुटूंबियांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करुन दोन्ही महिलांकडे पैशांचा तगादा लावला. तेंव्हा त्यांनी ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कुठेही तक्रार केल्यास आत्महत्या करु आणि चिठ्ठीमध्ये तुमची नावे टाकू, अशीही धमकी त्यांना दिली. हा प्रकार सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर याप्रकरणी परब कुटूंबियांनी अखेर १६ जानेवारी २०१८ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक किरण बघडाणे अधिक तपास करीत आहेत.
या आधीही फसवणूक
कदम आणि मोहिते या दोन्ही महिलांनी चारच दिवसांपूर्वी रेखा परब यांच्याही मुलीला बँकेत नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून दोन लाख १५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. यापूर्वीही २००८ मध्ये अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.