नंदूरबारच्या व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण: गुन्हयाचा एसीपींमार्फत तपासाचे आदेश
By जितेंद्र कालेकर | Published: July 12, 2018 11:30 PM2018-07-12T23:30:45+5:302018-07-12T23:30:45+5:30
अक्कलकुव्याचा व्यापारी रिजवान मेमन आणि त्याचा मित्र एजाज नुरु या दोघांना ओलीस ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणाची गांभीर्यता पाहून या गुन्हयाचा तपास थेट सहायक पोलीस आयुक्तांमार्फतीने करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले.
जितेंद्र कालेकर
ठाणे : अक्कलकुवा ( जिल्हा नंदुरबार) येथील व्यापा-याला बलात्काराच्या गुन्हयात अडकविण्याची धमकी देत त्याच्याकडून दोन लाखांची खंडणी उकळल्याच्या गुन्हयाचा तपास वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) महादेव भोर यांच्यामार्फत करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. या गुन्हयात वापरलेली एका खासगी कंपनीची कारही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अक्कलकुव्याचा व्यापारी रिजवान मेमन (२२) आणि त्याचा मित्र एजाज नुरु (२३) या दोघांना खंडणीसाठी ओलीस ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणाची गांभीर्यता पाहून या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षकाऐवजी थेट सहायक पोलीस आयुक्तांमार्फतीने करण्याचे आदेश बुधवारी पोलीस आयुक्तांनी दिले. सुरुवातीला हा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. नदाफ यांच्याकडे होता. परंतू, नदाफ पुण्याहून नव्यानेच आलेले असल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्याकडे हे प्रकरण आले. परंतू, पोलीस आयुक्तांच्या आदेशाने हा तपास आता एसीपींकडे सोपविण्यात आला आहे.
रिजवान आणि त्याचा मित्र एजाज यांना भिवंडीच्या काल्हेर भागातील एका लॉजवर ९ जुलै रोजी ओलीस ठेवले होते. त्यानंतर १० जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिपक वैरागड या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाने त्याला घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेलकडे नेण्यासाठी एका खासगी कंपनीची कार बुक केली. या कारमध्ये दिपक त्याचा साथीदार सोहेल पंजाबी आणि रिजवान तसेच त्याचा मित्र एजाज हे दोघे असे चौघेजण होते. काल्हेर येथून ही कार दोघांना घेऊन बाहेर पडल्यानंतर ते फाऊंटन नाका येथे गेले. या दोघांनाही पैशासाठी मारहाण शिवीगाळ करुन प्रचंड दबाव आणल्यानंतर रिजवानने त्याच्या धुळे येथील मित्राला फोन करुन तातडीने दोन लाख रुपये पैशांची मागणी केली. हे पैसे त्याने मित्राने नवी मुंबईतील वाशी येथील एका अंगडीया मार्फतीने देण्याचे मान्य केल्यानंतर हे चौघेही वाशीला पोहचले. तिथे ही दोन लाखांची रोकड घेतल्यानंतर ते ठाण्यात वर्तकनगर भागात आले. त्यानंतरही दहा हजार असे दोन लाख दहा हजार रुपये त्यांनी घेतले. तत्पूर्वीच आणखी दहा लाखांच्या खंडणीसाठी त्याच्यावर दबाव टाकला जात असल्यामुळे रिजवानने त्याचे वडील अब्दुल रहिम मेमन (सायकलीचे व्यापारी ) यांच्याकडेही या पैशांची मागणी केली होती. त्यांनीच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील आणि पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीरा पोलीस ठाण्याचे काशीमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख या दोन पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.
दरम्यान, ही कार वर्तकनगर येथून माजीवडा भागात येत असतांनाच ठाणे ग्रामीण पोलिसांनी रिजवान आणि एजाज या दोघांची सुखरुप सुटका करुन दिपक वैरागड (पोलीस शिपाई, वर्तकनगर पोलीस ठाणे) आणि सोहेल राजपूत या दोघांनाही ताब्यात घेतले. ज्या रिक्षाने रिजवान आणि सोहेलची मैत्रिण येऊरच्या एका बंगल्यावर गेले ती रिक्षा आणि रिक्षा चालक तसेच त्या मैत्रिणीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
....................................
साप्ताहिक सुटीच्या दिवशी केला प्लान
खंडणीसाठी व्यापाºयाला येऊरच्या बंगल्यातील जाळयात दिपक आणि त्याच्या साथीदारांनी अडकविले, त्या ९ जुलै रोजी दिपकची साप्ताहिक सुटी होती. तर १० जुलै रोजी त्याला रात्री पाळी होती. दिवसभरात खंडणीची रक्कम वसूल केल्यानंतर आरामशीर रात्र पाळीच्या डयूटीवर येण्याची त्याची योजना होती. पण, तत्पूर्वीच पोलिसांच्या जाळयात तो अडकला.
...............................
थेट वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या नियंत्रणाखाली सुरु असलेल्या या तपासातील सर्व बारकावे गोळा केले जात आहेत. ज्या ठिकाणी सुरुवातीला सोहेलच्या मैत्रिणीने रिजवानला अडकविले, त्या येऊरच्या बंगल्याचा तपशीलासह त्यांचे आणखी कोण कोण साथीदार आहेत, याचीही चौकशी केली जात आहे. गुरुवारी पोलिसांनी जप्त केलेल्या कार चालकाचा जबाब नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ज्या मॉलमध्ये रिजवान आणि त्याची सोहेलची मैत्रिण ९ जुलै रोजी फिरायला गेले त्या मॉलच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात आहे. यातील रिक्षा चालक आणि त्या तरुणीचाही शोध घेतला आहे. ’’
महादेव भोर, सहायक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग, ठाणे
........................
काय घडला प्रकार
सोहेलच्या मैत्रिणीने व्हॉटसअॅपच्या माध्यमातून रिजवानशी मैत्रि करुन त्याला ठाण्यात बोलविले. ठाण्यात आल्यानंतर ते एका मॉलमध्ये फिरले. रिजवान त्याचा मित्र एजाजसह तिच्याबरोबर येऊरला गेला. तिथे बंगल्यावर एजाज बाहेर थांबला. त्याठिकाणी रिजवान आणि त्यांच्यात संबंध आल्यानंतर दिपक वैरागडने धाडनाटय केले. त्यानंतरच रिजवानला बलात्काराच्या गुन्हयात अडकविण्याची धमकी देत त्याचे अपहरण करुन दोन लाख दहा हजारांची खंडणी वसूल करण्यात आली.याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ओलीस ठेवणे, मारहाण करणे, धमकी देणे, अपहरण करणे आणि पैशांची मागणी करणे आदी कलमांखाली चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
........................................