जिल्ह्यातील प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीसाठी राष्ट्रीय लोक न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 05:45 PM2019-02-15T17:45:17+5:302019-02-15T17:54:23+5:30
ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, १३८ एन. आय. अॅक्ट(चेक संबधित) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, महसुली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी
ठाणे : जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र असलेले खटल्यांवर सुनावणी होऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या आधी ९ मार्च रोजी होणारे हे लोकन्यायालय आता १७ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये पार पडणार आहे. याचा लाभ मोठ्यासंख्येने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, १३८ एन. आय. अॅक्ट(चेक संबधित) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, महसुली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यालयात ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांचेकडे अर्ज करण्याचे आवाहन सर्व पक्षकारांना करण्यात आले आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम आर देशपांडे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व पक्षकारांना कोणतीही समस्या असेल व इतर चौकशी करायची असल्यास त्यांनी वाशी, नवी मुंबई, भिवंडी , कल्याण, मुरबाड , शहापूर, उल्हासनगर, पालघर, वसई, वाडा, डहाणू, जव्हार आदी ठिकाणच्या न्यायालयातील विधी सेवा समिती कार्यालयाशी संपर्क साधवा. या शिवाय काय समस्या व लोक न्यायालयाशी संबंधीत काही माहिती हवी असल्याच पक्षकारांनी येथील जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्याशी न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येऊन किंवा २२-२५४७६४४१ या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.