राष्ट्रवादीने करुन दिली शिवसेनेला वचन नाम्याची आठवण, बॅनरवरुन गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 04:01 PM2018-04-26T16:01:51+5:302018-04-26T16:01:51+5:30
शिवसेनेने दिलेल्या वचननाम्याची चिरफाड करणारा बॅनर राष्ट्रवादीने ठाण्यात लावला आणि काही क्षणातच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर खाली उतरविला. करवाढीच्या मुद्याचा हा बॅनर मात्र ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होता.
ठाणे - पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन शिवसेनेने ठाणेकरांना दिले होते. आपल्या वचननाम्यामध्ये तसे लेखी वचनही दिले होते. मात्र, करमाफी तर सोडा थेट १५ टक्के करवाढ करून शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सेनेला वचननाम्याची आठवण करून देणारा शिवसेनेने केली ठाणेकरांची फसवणूक या मथळ्याखाली आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक फलक ठाणे शहरात लावला. ठाणेकरांची फसवणूक करणाऱ्या शिवसेनेने ठाणेकरांची माफी मागावी, प्रशासनावर वचक नसल्याने सत्ता सोडून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे. दरम्यान, काही तासातच सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा फलक काढला.
मागील वर्षी झालेल्या ठरावामध्ये ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी यंदापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मागील महासभेत ही करवाढ ३४ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव रद्द केलेला नसताना तसेच तांत्रिकदृष्ट्या ही करवाढ करणे शक्य नसताना हा ठराव महासभेत मंजुरीसाठी घेण्यात आला, हा महासभेचा अवमान आहे. काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादीने यास विरोध केल्यानंतरही गदारोळात शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात करवाढीचा उल्लेख नसला तरी या प्रस्तावामुळे ठाणेकरांचे कंबरडे मोडले आहे. सन २०१५-१६ मध्ये १० टक्के, २०१६-१७ मध्ये पाच टक्के आणि आता थेट १५ टक्के करवाढ करून शिवसेनेने विश्वास ठेवणाºया ठाणेकरांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी जे लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते तेच आश्वासन ठामपातील सत्ताधारी विसरले असल्याने आम्हाला होर्डींग्ज लावून त्याची आठवण करून द्यावी लागली, असे परांजपे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेने केली ठाणेकरांची फसवणूक या मथळ्याखालील हा होर्डींग्ज शिवसैनिकांनी लागलीच खाली उतरविला. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला महत्वाचे स्थान असते. मात्र, येथे दबावतंत्र वापरून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, जनतेची ही फसवणूक आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला.