केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:13 AM2018-02-08T03:13:23+5:302018-02-08T03:13:31+5:30
केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरिबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किमती वाढवल्याने दूध, भाज्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे.
ठाणे/मुंब्रा : केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरिबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किमती वाढवल्याने दूध, भाज्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. इंधनावर सेस टॅक्स वाढवल्याने त्याचा परिणाम गरिबांच्या अन्नावर झाला आहे. यामुळे हा अर्थसंकल्प देशातील शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, मध्यमवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. याचाच अर्थ भाजपा सरकार गरिबांविरोधातील असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकºयांनी चक्क चूल पेटवून त्यावर अन्न शिजवले.
केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मुंब्रा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. केंद्राने नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याला गरिबांच्या आणि देशविरोधातील अर्थसंकल्प मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा तहसीलदार कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून चुलीवर स्वयंपाक बनवून सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाचे आयोजन कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान आणि युवक अध्यक्ष शानू पठाण यांनी केले होते. हे सरकार देश आणि गरिबांविरोधातील आहे, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील व्यापारी, कारखानदारवर्गही देशोधडीला लागत आहे. आईवडिलांनी मोठ्या कष्टाने मुलामुलींना शिक्षण देऊन उच्चशिक्षित केले आहे. मात्र, या मुलांसमोरचे भविष्य अंधकारमय झाले आहे. देशाचे पंतप्रधान अशा मुलांना पकोडे विकायला सांगत आहेत. रस्त्यावर हातगाड्या लावून पकोडे विकण्यासाठीच आम्ही मुलांना शिक्षित केले आहे का, असा सवाल करून आमदार आव्हाड यांनी मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला. राज्याचे सरकार चालवणाºया फडणवीस सरकारचाही समाचार घेतला.
देशात आणि राज्यात जातीय द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. विरोधकांची पोलिसांच्या बळावर मुस्कटदाबी केली जात आहे. विरोधकांवर जरब बसावी म्हणून भुजबळ यांच्यासारख्यांना कारागृहाबाहेर येऊ दिले जात नाही. हे सरकार सत्तेवर येताच देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, यावेळी चुलीवर बनवलेले अन्न मोर्चेकºयांनी खाल्ले.