नवीन कळवा पुलाचे आयुर्मान वाढणार, बसवणार ‘आरोग्यतपासणी’ यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 03:22 AM2018-03-16T03:22:24+5:302018-03-16T03:22:24+5:30
ठाणे-कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या तिसºया पुलाचे काम आता डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा दावा पालिकेने केला आहे.
ठाणे : ठाणे-कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या तिसºया पुलाचे काम आता डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, भविष्यात या पुलावरील वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता त्याचे आयुर्मान उत्तम राहावे, या उद्देशाने ठाणे महापालिकेने त्यावर आरोग्यतपासणी यंत्रणा (नेव्हिगेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सयंत्र) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. शास्त्रीय पद्धतीने ही यंत्रणा पुलाच्या आरोग्याची तपासणी करणार असून त्याआधारे तत्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे.
मुंबईतील सी लिंक या सागरी सेतूच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनेदेखील विटावा पुलाखालील आणि एकूणच या भागातील वाहतूककोंडी सुटावी, यासाठी या कळवा खाडीपुलावर तिसºया नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये पुढे आणला होता. सध्या येथील कळवा खाडीवर एक ब्रिटिशकालीन आणि आणखी एक पूल आहे. परंतु, ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्यावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे दुसºया पुलावर वाहतुकीचा वेग मंदावला आहे. परंतु, दुसरा पूलही वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसºया पुलाचा पर्याय पुढे आणला. महापालिकेने २०११ च्या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर, आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर हा पूल उभारण्यात येणार आहे.
असा असणार पूल...
ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वन वे पूल असणार आहे. तर, विटाव्याकडून येणाºया वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. या तिसºया पुलामुळे येथील वाहतूककोंंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगाव (मनीषानगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे-बेलापूर दिशेला असा दोन्ही मार्गांनी हा पूल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येताना तो साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाकामार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. तसेच आता यात थोडा बदल केला असून आत्माराम चौकापर्यंतचा रस्ता या पुलाला जोडण्यात येणार आहे. केबलस्टेड टाइपचा हा पूल असणार असून तो दीड किमीचा असणार आहे. यामुळे विटावा पुलाखालील आणि कळवानाक्यावर होणारी वाहतूककोंडी फुटणार असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.
>डिसेंबरअखेर होणार पुलाचे काम; पालिकेने केला दावा
येत्या डिसेंबरअखेर या पुलाचे काम पूर्ण होईल, असा दावा आता पालिकेने केला असतानाच त्यावर बांधकाम आरोग्यतपासणी यंत्रणा (नेव्हिगेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सयंत्र) बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या पुलावरील भविष्यातील संभाव्य अपघातांचे धोके टाळावेत आणि पुलाच्या दुरु स्तीसाठी मोठा खर्च निघू नये, त्याचे आयुर्मान उत्तम राहावे, या उद्देशातून ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. यासाठी १३० कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे.
नेव्हिगेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सयंत्राचे सेन्सर पुलाच्या बांधकामामध्ये बसवले जाणार आहे. पुलाच्या पायाभरणीमध्येच हे सेन्सर बसवले जाणार आहेत. या सेन्सरमुळे पुलाच्या खाली सुरू असलेल्या हालचालींच्या आधारे त्याच्या आरोग्याची नोंद होणार आहे. त्यामुळे भविष्यात या पुलाला मोठा धोका निर्माण होणार असेल, तर त्याची माहिती आधीच सेन्सरद्वारे पालिकेला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुलाचे संभाव्य धोके टाळून त्यावर तत्काळ उपाययोजना करणे पालिकेला शक्य होणार आहे. तसेच पुलाचे आयुर्मान वाढवण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
>दुसºया पुलाला
बसवण्याचा
होता प्रयत्न
नेव्हिगेशन स्पॅन स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर सयंत्र दुसºया खाडीपुलावर बसवण्याचा विचार महापालिका प्रशासनाचा होता. मात्र, या पुलावर ही यंत्रणा बसवणे शक्य नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. असे असले तरी शहरातील सॅटीस, मुंब्रा बायपास तसेच अन्य पुलांच्या ठिकाणी ही यंत्रणा बसवता येऊ शकते का, याचीही चाचपणी पालिकेकडून करण्यात येणार आहे.