जगभरात नविन पालक गोंधळलेले आहे - सुरेंद्र दिघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 03:52 PM2018-09-06T15:52:15+5:302018-09-06T15:53:23+5:30
ठाणे: जागतिक पातळीवर आता चर्चा सुरू झाली आहे. आपल्याकडील पालक गोंधळलेले आहेत. आपल्या मुलाची क्षमता, आपल्या मुलांना काय द्यायचे हे पालकांना कळलेले नाही, अमेरिकेतही तीच परिस्थिती आहे. हा आताच्या काळाचा परिणाम आहे. जगभरात नविन पालक गोंधळलेले आहे. आपल्या मुलांचे पुढे काय होणार याची कोणालाही कल्पना नाही. आपल्या मुलाची क्षमता ओळखून त्याला मेहनत करायला लावणे ही आताच्या पालकांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी अत्रे कट्ट्यावर केले.
सुरेंद्र व सुमीता दिघे यांची मुलाखत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनंत देशमुख यांनी घेतली. यावेळी सुरेंद्र दिघे म्हणाले की,
पालकत्व आणि शिक्षण हे बरोबरीने जातात, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुले ही आपोआप शिकत असतात आपण उगाच त्यांना शिकवायला जातो. आपल्याकडे आपल्या मुलाचा पहिला क्रमांक यावा यावर भर असतो, अमेरिकेत मात्र शिक्षणाकडून अपेक्षा नसतात. आपल्याकडे भातुकलीचा खेळ मुख्यत: मुली खेळतात. अमेरिकेत या खेलाला प्रिटेण्ड क्ले म्हणतात, त्यावर शास्त्रोक्त संशोधन सुरू आहे. या खेळाकडे आजी आजोबांनी काळजीपुर्वक पाहिले, या खेळातील चिमुकल्यांची बडबड ऐकली तर ही मुले कुठे शिकली असा विचार पडतो. त्यांची कल्पनाशक्ती वाढते आणि तिथून संशोधन वाढते. भातुकलीचा खेळ हा मोठा ज्ञानाचा भाग आहे. छोट्या छोट्या गोष्टींतून शास्त्रोक्त पद्धतीचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. सुमिता दिघे म्हणाल्या की, आपल्याकडील आणि पाश्चात्य पालकत्वामध्ये खुप मोठा फरक आहे. आपल्याकडे पालकत्व आपोआप येते. परंतू अमेरिकेत पालकत्वाचा विचार करतात, शिक्षणाचा विचार करतात आणि मग पालकत्व स्वीकारतात. बालक - पालक - शिक्षण ही संकल्पना अमेरिकेत आहे. आपल्याकडे पालकत्व समाजाने स्वीकारलेले असते तिथे मात्र दोघेच स्वीकारतात, त्यांच्यातील पालकत्वामध्ये मुलाची सुरक्षितता, स्वच्छता आणि स्वावलंबीपणा यावर भर दिला जातो म्हणून त्यांच्यावर पालकत्वाची जबाबदारी वाढत जाते. मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे तिथे लहानपणापासून लक्ष दिले जाते असे त्या म्हणाल्या. पाहुण्यांचा परिचय रश्मी जोशी यांनी करुन दिला.