भिवंडीत नऊ महिन्यांत ४,४६१ जणांना श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:06 AM2017-09-19T05:06:27+5:302017-09-19T05:06:32+5:30
कामतघर-फेणेपाडा येथील डम्पिंग ग्राऊंडवर आठ वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. त्याच वेळी गेल्या नऊ महिन्यांत भिवंडीत ४,४६१ जणांना कुत्र्यांनी चावे घेतल्याने त्यांच्यावर रेबीजची लस टोचून घेण्याची वेळ आल्याची माहिती उघड झाली आहे.
भिवंडी : कामतघर-फेणेपाडा येथील डम्पिंग ग्राऊंडवर आठ वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. त्याच वेळी गेल्या नऊ महिन्यांत भिवंडीत ४,४६१ जणांना कुत्र्यांनी चावे घेतल्याने त्यांच्यावर रेबीजची लस टोचून घेण्याची वेळ आल्याची माहिती उघड झाली आहे.
पालिकेच्या अर्थसंकल्पात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दरवर्षी २५ लाखांची तरतुद केली जाते, पण स्वच्छता व आरोग्य विभागाने २०१२ पासून निर्बीजीकरणाचे काम बंद केले. पालिकेची १५ शहरी आरोग्य केंद्रे शहरात ठिकठिकाणी असली, तरी तेथे रेबीजची लस उपलब्ध नाही. त्यामुळे कुत्रा चावलेल्या व्यक्तीला आरोग्य केंद्रातील डॉक्टर इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठवितात. कुत्रा चावण्याच्या वाढणाºया घटना पाहता वैद्यकीय अधिकारी विद्या शेट्टी यांनी सर्व आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध करून देण्याची गरज होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. इंदिरा गांधी रूग्णालयात जानेवारी २०१७ ते आॅगस्ट २०१७ पर्यंत ४,२१६ श्वानदंशाच्या रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात १७ तारखेपर्यंत २४५ रूग्णांना श्वानदंशामुळे रेबीजची लस दिल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने २००५-०६ मध्ये निविदा काढून पनवेलच्या राज्य कृषी व पशुवैद्यकीय तांत्रिक कुशल सेवा संस्थेमार्फत २००७ पर्यंत ३,९५७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. २००८ ते २०११ च्या मार्चपर्यंत अंबरनाथ अॅनिमल वेल्फेअर संस्थेने १८,९५९ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. त्यानंतर मात्र हे काम बंद झाले.
स्वच्छता व आरोग्य विभागातील निरीक्षकांच्या सर्र्व्हेनुसार शहरात सध्या ४,७५३ भटके कुत्रे आहेत. हा आकडा चुकीचा असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्या आधारे त्यांनी निर्बीजीकरण झालेल्या कुत्र्यांच्या संख्येबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.