ओडिशातील गांजाची तस्करी : ठाणे पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:33 PM2018-03-06T23:33:22+5:302018-03-06T23:33:22+5:30
ओडिशातील गांजा ठाण्यात आणणा-या टोळीतील सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक आता आंध्रप्रदेशात रवाना झाले आहे. या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
ठाणे : ओडिशा येथून विशाखापट्टणममार्गे ठाणे आणि कल्याण परिसरात गांजाची तस्करी करण्यासाठी आलेल्या व्हिक्टर जोसेफ आणि बल्ला विराबदरराव या दोघांनाही आंध्र प्रदेशमध्ये गांजा देणा-याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली आहे. याच माहितीच्या आधारे तिथून गांजाची विक्री करणा-याला ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथक आता आंध्र प्रदेशात रवाना झाले आहे.
जोसेफ आणि बल्ला या दोघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ३ मार्च रोजी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, उपनिरीक्षक धर्मराज बांगर आणि पोलीस नाईक दिलीप सोनवणे आदींच्या पथकाने ही कारवाई करून त्यांच्याकडून एका सॅकमधून साडेसहा किलोच्या गांजासह एक लाख एक हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. ओडिशातून विशाखापट्टणममध्ये येणारा गांजा व्हिक्टर आणि बल्ला यांनी ठाण्यात आणला होता. त्यांना गांजा देणारी व्यक्ती विशाखापट्टणमच्या एका बाजारात हमखास येत असते, अशी माहिती चौकशीत समोर आली. त्याच आधारावर गांजा तस्करीत असलेल्या टोळीचा मागोवा घेण्यासाठी बल्ला याच्यासह उपनिरीक्षक मनोहर घाडगे, पोलीस नाईक नामदेव मुंढे आणि प्रीतम भोगले आदींचे पथक आता आंध्र प्रदेशमध्ये रवाना झाले आहे. बल्ला याने दिलेल्या माहितीमध्ये तथ्य आढळले, तर या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.