मुंब्रा-कौसा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात मोर्चा , खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:35 AM2017-10-10T02:35:32+5:302017-10-10T02:35:50+5:30
पनवेलहून ठाण्याकडे जाणाºया मुंब्रा-कौसा महामार्गावरील रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, अवजड वाहतूक आदींमुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत.
पनवेल : पनवेलहून ठाण्याकडे जाणाºया मुंब्रा-कौसा महामार्गावरील रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, अवजड वाहतूक आदींमुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व माजी खासदार आनंद परांजपे यांनी सोमवारी शेकडो कार्यकर्त्यांसह पनवेलमधील भिंगारी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला.
मोर्चाची तीव्रता लक्षात घेता पनवेल परिसरात बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. मुंब्रा कौसा मार्गाच्या दुरवस्थेमुळे आजवर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. आव्हाड यांच्या विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांपर्यंत मार्गाची समस्या मांडून देखील याबाबत काहीच निर्णय होत नसल्याने संतापलेल्या आव्हाडांनी पनवेल येथील कार्यालयावर धडक दिली. महामार्गावर पथदिवे सुरू करा, रस्त्यांची दुरुस्ती करा, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. पनवेल-मुंब्रा मार्गाची दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्यात येते, परंतु निकृष्ट कामामुळे पावसाळ्यात पुन्हा स्थिती जैसे थे होते. दरवर्षी पावसात रस्ता वाहून जातो. आॅगस्ट महिन्यात रस्त्याविषयी विधानसभेत लक्षवेधी मांडून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपुढे हा प्रश्न नेला होता. मागणीची दखल घेऊन कामाला सुरुवात देखील करण्यात आली. मात्र, कामाचे स्वरूप संथ असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. वारंवार होणाºया अपघातांमुळे हा रस्ता अखत्यारीत येत असलेल्या कार्यकारी अभियंता पनवेल यांच्या भिंगारी येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता. सहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावर तत्काळ उपाययोजना राबवण्याची मागणी या वेळी आव्हाड यांनी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी राहुल मोरे यांच्याकडे केली. या वेळी पंधरा दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी माघारी वळले.