ठाणे अर्थसंकल्पाला विरोधकांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:55 AM2018-03-23T00:55:06+5:302018-03-23T00:55:06+5:30
ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले. ते सादर केल्यानंतर त्यावर चर्चा न करताच राष्ट्रगीत सुरू झाले. याचा अर्थ ते विनाचर्चा मंजूर झाले, असा होत असूनही सत्ताधाऱ्यांकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुुरू केली आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले. ते सादर केल्यानंतर त्यावर चर्चा न करताच राष्ट्रगीत सुरू झाले. याचा अर्थ ते विनाचर्चा मंजूर झाले, असा होत असूनही सत्ताधाऱ्यांकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही आघाडीचे घटक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ३८ नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अंदाजपत्रकाला पाठिंबा जाहीर केला.
या वेळी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे गटनेते विक्र ांत चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, मुकुंद केणी यांच्यासह विरोधी पक्षांचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
मिलिंद पाटील यांनी सांगितले की, १९ मार्चच्या महासभेमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. त्या सभेमध्ये आयुक्तांच्या विश्लेषणानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यामुळे ही सभा संपल्याचे स्पष्ट झाले आहे. ती सभा तहकूब किंवा खंडित केलेली नाही. त्यामुळे नव्याने सभा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही बाब नजीब मुल्ला यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली आहे. शहर विकासासाठी हा चांगला अर्थसंकल्प असल्याने त्यास आमचा पाठिंबा असून नगरसेवकांच्या प्रभागातील नागरी कामांसाठी आयुक्तांनी निधी द्यावा, अशी आमची मागणी आहे. आयुक्तांनी त्याला सकारात्मकता दर्शवल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, हा अर्थसंकल्प नियमानुसार मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता सत्ताधाºयांनी जरी नव्याने महासभा बोलावण्याचा प्रयत्न केला तर, ती सभा आधी कायदेशीर आहे की बेकायदेशीर, हे आम्ही पडताळून पाहणार असून ती बेकायदेशीर असल्यास अनुपस्थित राहू, असेही पाटील यांनी सांगितले. बुधवारच्या महासभेत अधिकारी वर्ग अनुपस्थित राहणे हा सत्ताधाºयांचा पराभव असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
ठाणे महापालिकेकडून ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ठाणेकरांच्या हितासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारादेखील यावेळी लोकशाही आघाडीने दिला.