सेवा रस्त्यालाही आता सम विषय पार्कींगचा दिला जाणार उतारा, पालिका आणि वाहतुक विभागात उडणार खटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:23 PM2017-12-06T16:23:39+5:302017-12-06T16:26:19+5:30
नौपाड्यात वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी जो बदल करण्याचा विचार वाहतुक पोलिसांनी सुरु केला आहे. तोच पी वन, पी टूचा उतारा आता सेवा रस्त्यांच्या बाबतही लागू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.
ठाणे - सेवा रस्ता अडविणारे गॅरेजवाले आणि शोरुमवाल्यांच्या विरोधात पालिकेने कडक धोरण आखून त्यांच्याकडून १० हजार रुपये दंड आकारण्याचेही निश्चित केले होते. परंतु तरीदेखील येथील रस्ते काही केल्या मोकळे होतांना दिसत नाहीत. त्यामुळे आता ठाणे वाहतुक पोलिसांनी आता यावर उपाय म्हणून येथील कोंडी सोडविण्यासाठी नौपाड्यातीलच पी वन, पी टू चा फॉर्मुला आजमावण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पालिकेने काही रस्त्यांवर पार्कींगसाठीचे पिवळे पट्टे आखले आहेत. परंतु वाहतुक विभागाच्या या हालचालीमुळे पालिका आणि वाहतुक पोलीस यांच्यात यावरुन खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाण्यात हायवे लगत सेवा रस्ते आहेत. मात्र या सेवा रस्त्यांवर दोनही बाजूला वाहतुक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दोनही बाजूला कशाही पध्दतीने पार्कींग होत आहे. तसेच येथील गॅरेजवाले आणि शोरुम वाल्यांना हे सेवा रस्ते आंदनच दिले की काय अशी परिस्थिती दिसत आहे. त्यांच्या गाड्या फुटपाथपासून थेट रस्त्यापर्यंत लागलेल्या असतात. त्यामुळे वाहतुक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. या बेकायदा पार्कींग विरोधात महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून यापुर्वी अनेकदा कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर पथक मागे फिरताच या ठिकाणी पुन्हा बेकायदा पार्कींग सुरू होते. या पार्कींगमुळे सेवा रस्ते वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडल्याने तेथील कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे. विशेष म्हणजे पालिकेने येथील कोंडी सोडविण्यासाठी आता गॅरेज आणि शोरुम वाल्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. तसेच कारवाई करुनही येथे वाहने लागल्यास १० हजार रुपये दंडाची तरतुद पालिकेने केली होती. परंतु आतापर्यंत किती गॅरेज आणि शोरुमवाल्यांकडून दंडाची रक्कम वसुल झाली याचा उलघडा न केलेलाच बरा. शिवाय पार्कींग धोरण राबविण्याच्या दृष्टीने पालिकेने काही सेवा रस्त्यांवर पिवळे पट्टे देखील आखले आहेत. परंतु वाहतुक पोलिसांनी सुचविलेल्या नव्या बदलामुळे, पिवळे पट्टे गायब होण्याची शक्यता आहे. वाहतुक विभागामार्फत सेवा रस्त्यांवर पी वन, पी टू पार्कींग करण्याचा विचार सुरु झाला आहे. सेवा रस्त्यांवरील बेकायदा पार्कींगला शिस्त लागावी आणि वाहतूकीसाठी रस्ता मोकळा रहावा यासाठी ही योजना राबविण्याचा विचार असल्याचे वाहतुक विभागाने स्पष्ट केले. सेवा रस्त्यांवर कोणत्या भागात सम-विषम पार्कींग होऊ शकते, त्याठिकाणी किती वाहने उभी राहू शकतात, या पार्कींगमुळे वाहतूकीला अडथळा होणार नाही ना, या सर्वाचा अभ्यास करण्यात येत आहे. परंतु पालिकेने मारलेल्या पिवळ्या पट्यांचे काय करायचे असा पेचही त्यांना सतावत आहे. त्यामुळे वाहतुक विभागाने पी वन, पी टू चा पर्याय येथे राबविला तर पालिका आणि वाहतुक विभाग यांच्यात खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.