खाडी स्वच्छतेसाठी लोकसहभाग अत्यावश्यकच, ठाण्यात पार पडली खाडी सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:26 PM2018-01-06T16:26:00+5:302018-01-06T16:28:27+5:30
जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्ताने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने खाडी सफारीचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी या वषार्तील पहिली खाडी सफारी पार पडली.
ठाणे : खाडीच्या स्वच्छतेविषयी जनजागृती होत चालल्याने खाडीतील प्रदुषण काहीशा प्रमाणात कमी होत चालले आहे, घनकचरा कमी होत चालला असून पाण्यातही सकारात्मक बदल होत आहे. त्यामुळे मासे येऊ लागले आहे. परंतू खाडीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी १०० टक्के लोकसहभाग आवश्यक आहे असे निरीक्षण खाडी सफारीदरम्यान नोंदविण्यात आले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने शनिवारी सकाळी खाडी सफारी पार पडली. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रसाद कर्णिक यांनी मार्गदर्शन केले. या सफारीत पर्यावरणप्रेमी आणि पत्रकार सहभागी झाले होते. गेल्या १५ वर्षांपासून काडीत मासे मिळत नव्हते परंतू प्रदुषणाचे प्रमाण घटत चालल्याने मासे मिळू लागल्याचे मच्छीमार प्रविण कोळी यांनी यावेळी सांगितले. कस्टम जेट्टी ते भांडुप पर्यंत खाडी सफारी करण्यात आली. यावेळी मासे, तसेच, विविध प्रकारांचे पक्षी आढळून आले.
खाडीतले प्रदुषण कमी होत चालले तरी प्लास्टीकचा कचरा आढळून आला. यात प्लास्टीकच्या पिशव्या, प्लास्टीक बाटल्या तसेच, निर्माल्यही आढळून आले. खाडीची ही सद्य परिस्थीती पाहता १०० टक्के खाडी प्रदुषणमुक्त होणे गरजेचे आहे असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. ठाणे खाडीच्या संवर्धनासाठी व संरक्षणात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेल्या १८ वर्षापासून ‘स्वच्छ खाडी अभियान’ हा उपक्र म चालवत आहे. खाडीच्या पाण्यात उतरून खाडीची स्वच्छता करणे नाही, तर नागरिकांना खाडीमध्ये कचरा टाकण्यापासून रोखणे असा या अभियानाचा उद्देश आहे. स्वच्छ खाडी अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्र म करून लोकांना सुजाण बनवण्याचे काम संस्थेतर्पे केले जात आहे. नागरिकांची जबाबदारी त्यांना कळली की, खाडी व पर्यावरण आपसूकच निर्मळ होईल असा संस्थेचा मानस आहे. ठाणे खाडीबाद्द्ल आणखी जनजागृती करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ७, १३, १४, २५, २६, २७ आणि २८ जानेवारी या दिवसांत खाडी सफारीचे आयोजन केले आहे. या सफारीमध्ये ठाणे खाडी, त्यातील अनेक पक्षी, मासे, कीटक, फुलपाखरे, साप, प्राणी, खारफुटीची झाडे व इतर जैवविविधता प्रत्यक्ष पाहण्याची संधी पर्यावरणप्रेमींना मिळत आहे. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी नियोजन भवन, कलेक्टर आॅफिस, ठाणे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी जागतिक पाणथळ भूमी दिनाबद्दल जनजागृती अभियान कार्यक्र म आयोजित करण्यात आला असून ज्या शाळांना आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्र म आयोजित करावयाचा आहे त्यांनी लवकरात लवकर संस्थेशी संपर्कसाधण्याचे आवाहन केले आहे. ३ फेब्रुवारी रोजी सोमैय्या कॉलेज, विद्याविहार येथे जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेमध्ये ज्या महाविद्यालयांना सहभागी व्हायचे आहे त्यांनीही संस्थेशी संपर्क साधावा. लवकरात लवकर दोन्ही कार्यक्र मांसाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी पर्यावरण दक्षता मंडळ, ३ सुशीला, काका सोहोनी पथ, घंटाळी, ठाणे (प.) संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.