कवी म. पां. भावे यांच्या सहवासात मी प्रगल्भ झालो : कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:58 PM2018-12-31T14:58:55+5:302018-12-31T15:02:22+5:30
रामदास खरे यांचे रंग आणि विकास भावे यांचे शब्द, या दोघांची सृजनशीलता म्हणजे ही त्रिमिती
ठाणे: कवी म. पां. भावे यांच्यामुळे ठाणे शहराला वेगळा चेहरा लाभला, नवी ओळख मिळाली. त्यांच्या सहवासात मी प्रगल्भ झालो, मोठा झालो अशा भावना ज्येष्ठ कवी, गीतकार अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.
संवेदना प्रकाशन आयोजित कवी विकास भावे यांच्या त्रिमिती या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन शनिवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विकास भावे यांचे वडील कै कवी, गीतकार म. पां. भावे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले चित्रकार विजयराज बोधनकर म्हणाले की, फेसबुकच्या प्रभावी माध्यमातून चित्रकार रामदास खरे आणि कवी विकास भावे यांची कुंडली जुळली. यापूर्वी खरे आणि भावे यांनी साकारलेल्या चित्रकाव्य प्रदर्शनाला मी उपस्थित होतो. दोन कलांचे हे आगळेवेगळे फ्युजन माझ्यासोबत अनेक रसिकांना भावले. कवितेत चित्र शोधायची असतात तर चित्रात कविता शोधायची असते आणि ही अनुभूती घ्यायची असेल तर प्रत्येकाच्या अलमारीत त्रिमिती पुस्तक हे हवेच.
प्रारंभी संवादक प्रा. गीतेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तृप्ती भावे यांच्या ईशस्तवनाने कार्यक्र मास प्रारंभ झाला. कवी विकास भावे यांनी आपल्या मनोगतात खरे यांच्या चित्रांवर आधारित मी कविता साकारल्या, रसिकांना त्या भावल्या आणि त्यांच्याच आग्रहामुळे खरे यांची काही चित्र आणि माझ्या कविता या कविता संग्रहात मी रसिकांना अर्पण केल्यात. खरे यांनी सहा महिन्यांपूर्वी भरलेल्या चित्रकाव्य प्रदर्शनाला रसिकांचा मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याचे आज पुस्तक झाले याचा आनंद व्यक्त केला. यानंतर कै. म.पां. भावे स्मृती काव्य मंचाद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेत २१० कवींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रथम क्र मांक रवींद्र सोनवणी, व्दितीय कीर्ती पाटसकर, तृतीय सुजाता राऊत यांना मिळाला तर उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सुवर्ण सहस्त्रबुद्धे, जुई जोशी आणि प्रफुल्ल पाटील यांना देण्यात आले. प्रकाशन समारंभास पद्माकर शिरवाडकर, अरविंद दोडे, नारायण लाळे, मनीष पाटील, सतीश सोळांकूरकर, मंगेश विश्वासराव, सदानंद राणे, विजय जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्र माची सांगता पसायदानाने झाली.