राज्यात ‘कवितेचा दिवस’ दुर्लक्षितच! दिल्लीतील कार्यक्रमात प्रभा गणोरकर यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 02:27 AM2018-03-21T02:27:30+5:302018-03-21T02:27:30+5:30
युनेस्कोने २१ मार्च हा ‘जागतिक कविता दिवस’ म्हणून १९९९ पासून साजरा करण्याचे ठरवले असले, तरी महाराष्टÑात मात्र हा ‘एक दिवस कविते’चा दुर्लक्षितच राहिला आहे. या दिवसाच्या उद्देशानुसार ‘सृजनात्मक काव्य’ प्रोत्साहित होण्यापासून मुकले.
- महेंद्र सुके
ठाणे : युनेस्कोने २१ मार्च हा ‘जागतिक कविता दिवस’ म्हणून १९९९ पासून साजरा करण्याचे ठरवले असले, तरी महाराष्टÑात मात्र हा ‘एक दिवस कविते’चा दुर्लक्षितच राहिला आहे. या दिवसाच्या उद्देशानुसार ‘सृजनात्मक काव्य’ प्रोत्साहित होण्यापासून मुकले. दिल्लीत मात्र साहित्य अकादमीने आयोजित केलेल्या अ. भा. कविता उत्सवात ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर सहभागी होत आहेत.
युनोस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना) या दिवसानिमित्त सृजनात्मक काव्याचा सन्मान व्हावा, काव्य लेखन, वाचन आणि प्रकाशनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘विश्व कविता दिवस’ जाहीर केला. त्याचे औचित्य साधून भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि साहित्य अकादमीतर्फे वेगवेगळे कार्यक्रम होतात. दिल्लीत २१ मार्चला दिवसभर चार सत्रांत हा दिवस साजरा होणार असून, मराठी भाषक कवयित्री म्हणून डॉ. प्रभा गणोरकर उपस्थित राहणार आहेत.
दादर पूर्व येथील साहित्य अकादमीत २९ आणि ३० मार्चला नेपाळी, मराठी, कोकणी, हिंदी, गुजराती, आसामी, बोरो, मणिपुरी या भाषेतील साहित्याचा उत्सव भरणार असून, त्यात वेगवेगळ्या साहित्य प्रकारांसोबतच आठही भाषांच्या कविता परंपरेवरही भाष्य करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा किंबहुणे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या साहित्य कला संस्कृती मंडळातर्फे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. त्यात वेगवेगळ्या साहित्याचा गौरवही केला जातो. लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी कार्यशाळाही होतात. मात्र कविता दिवसाच्या निमित्ताने वेगळे कार्यक्रम होत नसल्याचे मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी सांगितले.
मुंबई, ठाणे परिसरात साहित्य आणि काव्यप्रेमी संस्था वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. २१ मार्च हा कार्यालयीन दिवस असल्याने, काही सांस्कृतिक संस्थांनी याच आठवड्याच्या अखेरीस काही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मुंबई, वसईत ‘मु.पो.कविता’
‘मु.पो.कविता’ हा उपक्रम राबवणारे संजय शिंदे यांनी मुंबईत २४ मार्चला विविध भाषेतील कवितांचा महोत्सव मुंबई मराठी साहित्य संघात आयोजित केला आहे. त्यात मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, अहिराणी, (मालवणी कविता सादर करणार आहेत. याशिवाय २५ मार्चलाही वसईतील मनोहर वाचनालयात कवितावाचनाचा सोहळा ‘मु.पो. कविता’च्या निमित्ताने साजरा होणार आहे.