ठाण्यातील स्ट्रीट गार्डनमधून ‘फुलपाखरू’ चोरणार्‍या दोघांना चितळसर पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 06:25 PM2018-04-15T18:25:17+5:302018-04-15T18:25:17+5:30

ठाणे महापालिकेच्या बगिच्यातून फुलपाखराची कृत्रिम प्रतिकृती चोरणाऱ्या दोन आरोपींना चितळसर पोलिसांनी रविवारी अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे बाळगोपाळांच्या चेहर्‍यावरील आनंद परतला आहे.

Police arrested both the thieves who stole artificial 'butterfly' from Thane Street Garden | ठाण्यातील स्ट्रीट गार्डनमधून ‘फुलपाखरू’ चोरणार्‍या दोघांना चितळसर पोलिसांकडून अटक

thane

Next
ठळक मुद्देगुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलही हस्तगतदोन दिवसात लावला गुन्ह्याचा छडागार्डन परिसरात सीसी कॅमेरे लावणार

ठाणे : ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक २ वरील महापालिकेच्या स्ट्रीट गार्डनमधून कृत्रिम फुलपाखरू चोरणार्‍या दोन युवकांना रविवारी अटक करण्यात आली. चितळसर पोलिसांनी ही कामगिरी केली.
पोखरण रस्ता क्रमांक २ वरील ग्लॅक्सो कंपनीपासून बेथनी हॉस्पिटलकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवर महापालिकेचे स्ट्रीट गार्डन आहे. बाळगोपाळांना फळे आणि प्राण्यांची माहिती मिळावी, यासाठी महानगरपालिकेने या गार्डनमध्ये कृत्रिम प्रतिकृती लावल्या होत्या. त्यापैकी निळ्या आणि गुलाबी रंगाच्या आकर्षक फुलपाखराची प्रतिकृती बाळगोपाळांसाठी आकर्षणाचे केंद्र होती. ही प्रतिकृती उत्कृष्ट सेल्फि पॉर्इंट म्हणून लोकप्रिय होती. १२ एप्रिल रोजी हे फुलपाखरू चोरी झाले. फुलपाखराची किंमत जास्त नसली तरी, दररोज गर्दी खेचणारी ही आकर्षक प्रतिकृती चोरी गेल्याने गार्डनमधील चैतन्य हरवले होते. ठाणे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद राऊळ यांनी चितळसर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दिली.
चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला. आरोपींचा कोणताही ठावठिकाणा माहित नसताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केला. तपासादरम्यान एका संशयास्पद मोटारसायकलचा नंबर पोलिसांना मिळाला. त्याआधारे पोलिसांनी माहिती काढून वागळे इस्टेटमधील हनुमान नगरातून निहाल जंगबहादूर सिंग (२४) याला शनिवारी अटक केली. चोरीचे फुलपाखरू पोलिसांना त्याच्या घरातच सापडले. निहाल सिंग याला अटक करून पोलिसांनी चौकशी केली असता या गुन्ह्यामध्ये आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार वागळे इस्टेटमधील इंदिरानगरातून गोविंद नरमु चव्हाण (२२) याला पोलिसांनी रविवारी अटक केली. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यासाठी मोटारसायकलचा वापर केला होता. ती मोटारसायकल आणि फुलपाखरूची प्रतिकृती असा ९0 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.
चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण बनगोसावी, पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे आदींनी ही कामगिरी केली.
आरोपींचा पहिलाच गुन्हा
आरोपी निहाल सिंग हा पेंटिंगचे काम तर गोविंद चव्हाण हा खासगी नोकरी करतो. दोघेही मित्र आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या तरी समोर आलेली नाही. आरोपींनी फुलपाखराची प्रतिकृती मोटारसायकलवर नेली. त्यामुळे त्याचे थोडेफार नुकसान झाल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली.
सुरक्षा रक्षक नेमणार
पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि तत्परतेने तपास केल्याबद्दल महापालिका आयुक्त संजिव जयस्वाल यांनी चितळसर पोलिसांचे अभिनंदन केले. यापुढे अशा घटना होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने स्ट्रीट गार्डनमध्ये सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत. खबरदारी म्हणून गार्डन परिसरात सीसी कॅमेरेही लावले जाणार आहेत.

Web Title: Police arrested both the thieves who stole artificial 'butterfly' from Thane Street Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.