खड्डे न बुजविणाऱ्या ठेकेदारांवर पालिका करणार गुन्हे दाखल, स्थायी समितीच्या बैठकीत दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:19 PM2018-07-18T16:19:42+5:302018-07-18T16:22:27+5:30
शहरातील जे रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत, ज्यांचे आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे, त्या रस्त्यांवर पडलेले खड्डे संबधींत ठेकेदाराने न बुजविल्यास त्या ठेकेदांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती नगरअभियंता अनिल पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
ठाणे - शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचा मुद्दा बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही चांगलाच गाजला. रस्त्यांवर कोट्यावधी खर्च करुनही त्यांना खड्डे कसे पडतात असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केला. डांबरी रस्त्यांसाठी वापरले जाणारे मटेरीअल देखील चुकीचे वापरले जात असल्याचा आरोप यावेळी सदस्य नारायण पवार यांनी केला. त्यामुळे अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशी मागणी देखील त्यांनी केली. परंतु रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा कालावधी निश्चित झाला असून त्या रस्त्यांवर जर खड्डे पडले असतील तर ते बुजविण्याची जबाबदारी ही त्या त्या ठेकेदारांची आहे. त्यांनी जर ते बुजविले नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती नगरर अभियंता अनिल पाटील यांनी दिली.
दरवर्षी येतो पावसाळा दरवर्षी पडतात रस्त्याला खड्डे अशी म्हणण्याची वेळ आता ठाणेकरांवर आली आहे. खड्डा दुरुस्तीसाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यावधींची तरतूद केली जाते. परंतु दरवर्षी रस्त्यांना खड्डे पडतात आणि दरवर्षी हा निधी ठेकेदारांच्या खिशात जातो. प्रत्यक्षात डांबरी रस्त्यांची बांधणी किंवा उभारणी ज्या तत्वानुसार करणे अपेक्षित आहे, त्या तत्वालाच ठाणे महापालिका तसेच ज्या ठेकेदारांना ही कामे दिली आहेत, त्या ठेकेदारांनी काळे फासल्याचा आरोप नारायण पवार यांनी यावेळी केला. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आणि आयुक्तांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली ही शोकांतीका असल्याची टिकासुध्दा त्यांनी केली. आता रस्त्यावर उतरुन अधिकाºयांचे केवळ फोटोसेशन सुरु असून पुन्हा रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरवात झाली असून याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नव्या रस्त्यांना देखील खड्डे पडल्याची टिका त्यांनी केली. १५० कोटींच्या रस्त्यांची कामेही पाण्यात केल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदार आणि पालिकेतील अधिकाºयांच्या संगणमतानेच ही कामे सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. प्रशासन अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान नवीन रस्त्यांना कुठेही खड्डे पडले नसल्याचा दावा नगर अभियंता अनिल पाटील यांनी केला. तर देखभाल दुरुस्तीसाठी जे रस्ते तयार आहेत, त्या रस्त्यांना खड्डे पडले आणि ते जर बुजविले गेले नाही तर संबधींत ठेकेदांराच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. परंतु पाऊस असल्याने खड्डे बुजविल्यानंतरही खड्डे पुन्हा पडू शकतात अशी शंकासुध्दा त्यांनी व्यक्त केली.