वागळे इस्टेट भागातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 09:46 PM2017-09-13T21:46:57+5:302017-09-13T21:47:01+5:30
वागळे इस्टेट, किसननगर येथून १७ वर्षीय ऋषिका मकवाना आणि पडवळनगर येथून ऊर्वी गोरी या दोघी जणी बेपत्ता झाल्या आहेत. ऊर्वी एप्रिलपासून तर ऋषिका ही जून २०१७ पासून गायब आहे.
ठाणे, दि. 13 - वागळे इस्टेट, किसननगर येथून १७ वर्षीय ऋषिका मकवाना आणि पडवळनगर येथून ऊर्वी गोरी या दोघी जणी बेपत्ता झाल्या आहेत. ऊर्वी एप्रिलपासून तर ऋषिका ही जून २०१७ पासून गायब आहे. या दोघींचेही अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून श्रीनगर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पडवळनगर येथे राहणारी ऊर्वी ही ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लहान बहीण वीराला काहीतरी खायला आणण्यासाठी घराबाहेर पडली. ती त्यानंतर घरी परतलीच नाही. तिचे कोणीतरी अपहरण केल्याची शक्यता तिची आई रेखा गोरी यांनी वर्तवली असून त्याबाबत श्रीनगर पोलीस ठाण्यात ७ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली आहे. ऊर्वीचे वय १७ वर्षे सात महिने, उंची ५ फूट ४ इंच, रंग गोरा, चेहरा गोल, डोळे तपकिरी, नाक सरळ, केस काळे, अंगाने मध्यम, अंगात लाल रंगाचा टी शर्ट आणि काळा पायजमा असे वर्णन असून तिला इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराथी आणि कच्छ अशा पाच भाषा बोलता येतात.
दरम्यान, किसननगर-१ भागात राहणारी ऋषिका हिचे ९ जून २०१७ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विनय मंगेश कांबळे याने अपहरण करून तिला पळवून नेले आहे. त्याबाबत तिची आई अलका मकवाना यांनी ११ जून रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिचे वय १७, उंची ५ फूट, गहूवर्णीय, उभट चेहरा, नाक सरळ, केस काळे, मध्यम बांधा असून तिलाही गुजराथी, हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान आहे. या दोन्ही मुलींबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक यू.बी. गावडे यांनी केले आहे.