जीएसटीमुळे आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:53 AM2018-01-17T00:53:59+5:302018-01-17T00:54:12+5:30
जीएसटी लागू केल्यामुळे यंदाच्या वर्षी कदाचित आपल्या देशाचे ‘आर्थिक वर्ष’ बदलले जाण्याची शक्यता आहे, असे मत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी येथे व्यक्त केले.
डोंबिवली : जीएसटी लागू केल्यामुळे यंदाच्या वर्षी कदाचित आपल्या देशाचे ‘आर्थिक वर्ष’ बदलले जाण्याची शक्यता आहे, असे मत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी येथे व्यक्त केले.
‘ब्राह्मण सभा’ डोंबिवली आणि ‘कौटिल्य नागरी सहकारी पतसंस्था’ यांच्यातर्फे ‘अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर’ या विषयावर ब्राह्मण सभेत शनिवारी सायंकाळी व्याख्यान झाले. या वेळी टिळक बोलत होते. ते म्हणाले की, ‘आर्थिक वर्ष बदलले जाणार असल्याने जीएसटी जुलैमध्ये लागू करण्यात आला. जीएसटीमुळे पाच वर्षांत नुकसान झाल्यास भरपाई दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. जीएसटी जुलैमध्ये आल्यामुळे वर्ष तर पूर्ण गृहीत धरले जाईल, पण भरपाई पाच महिन्यांची द्यावी लागेल. त्यात काही गैरही नाही. आपले नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असेल. नवीन आर्थिक वर्ष १ जानेवारीला सुरू होणार असेल, तर अर्थसंकल्प सप्टेंबरमध्ये सादर होईल.’
ग्राहक खूप काही अपेक्षा व्यक्त करत असतो. परंतु, आपल्याला हवे ते मिळेलच, असे नाही. ग्राहक म्हणून किमती कमी असाव्यात, ही आपली अपेक्षा असते. दुसरीकडे ग्राहकांना चार लाख ते पाच लाखांच्या उत्पन्नावर करसवलत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली, तरी ती देताना सरकारला महसुलाची बांधाबांध करावी लागते. जीएसटीतून सातत्याने उत्पन्न मिळत नाही, तोपर्यंत करात सवलत दिली जाणार नाही. आजचे व्याख्यान म्हणजे पतंगबाजीसारखे आहे. कोण कोणाचा पतंग छाटेल, हे समजणार नाही, असे टिळक म्हणाले. सगळ्या गोष्टी या आधारकार्डशी जोडल्या जाणार आहेत. एखाद्याने फसवले तरी आधारमुळे त्याचे रेकार्ड तयार झालेले असणार आहे. बँक सिक्युरिटी निर्माण करतील. त्याची सुरुवात येत्या अर्थसंकल्पातून होईल, असे त्यांनी सांगितले.