प्राथमिकच्या १४५ वर्गखोल्या डिजीटल ? ठामपाचा निर्णय: दोन कोटी खर्च अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:03 AM2017-12-21T01:03:26+5:302017-12-21T01:03:57+5:30
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने २१ प्राथमिक शाळांमधील १४५ वर्गखोल्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने २१ प्राथमिक शाळांमधील १४५ वर्गखोल्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. राज्यपातळीवर होणा-या शैक्षणिकगुणवत्तेत महाराष्ट्राला पहिल्या तीन क्र मांकांत स्थान मिळवून देणे तसेच दहावीपर्यंत मुलींच्या गळतीचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणणे, यासाठी राज्य शासनाने विविध कार्यक्र म हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानेदेखील हे पाऊल उचलले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला काही उद्दिष्टे दिली आहेत. त्यामध्ये सर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा या अनुक्रमे ५० टक्के आणि २५ टक्के करणे, या उद्दिष्टाचा समावेश आहे. याशिवाय, माध्यमिक शाळा २० टक्के प्रगत करणे, जिल्ह्यातील किमान ३०० शाळांना ‘अ’ दर्जामध्ये आणणे, मोबाइल अॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवणे, दप्तराचे ओझे कमी करणे, शाळाबाह्यमुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदींचा त्यात समावेश आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे.
उर्वरित वर्गखोल्या टप्प्याटप्प्याने डिजिटल करण्याचा मानस असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्र मासाठी दोन कोटी दोन लाख रु पये इतका खर्च अपेक्षित असून त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यामध्ये अप्रगत शाळांनी प्रगत झालेल्या शाळांना भेटी देणे, प्रत्येक वर्ग डिजिटल करणे, १०० टक्के शिक्षकांना तंत्रस्नेही करणे, १०० टक्के संकल्पनांवर ई-साहित्य तयार करणे, एक स्टेप या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे, शाळासिद्धी या पोर्टलवर स्वमूल्यमापन तसेच इतर कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
या कार्यक्र मांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिका शिक्षण विभागाने शाळांसाठी संगणक आणि प्रिंटरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १४८ संगणक आणि १३४ प्रिंटर खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आता महासभेत यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे.