ठाण्यातील गडकरी रंगायतन दुरुस्तीचा फटका जनकवी पी. सावळाराम पुरस्कार सोहळ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:12 PM2017-12-11T17:12:39+5:302017-12-11T17:16:29+5:30
गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचा फटका आता जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सोहळ्याला देखील बसला आहे. हा सोहळा आता पुढे ढकलण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे - ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम आता सुरु झाले आहे. या दुरुस्तीला आणखी १० दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता पालिकेने वर्तविली आहे. त्यामुळे काही कार्यक्रम रद्द तर काही कार्यक्रम संस्थेंच्या सोईनुसार डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात वर्ग करण्यात आले आहेत. परंतु या दुरुस्तीचा फटका आता जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सोहळ्यालाही बसला आहे. आता हा सोहळा पालिकेने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या वतीने संगीत, चित्रपट, साहित्य, नाटय, कला व शिक्षण क्षेत्रात अव्दितीय कामिगरी करणाºया गुणीजनांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. त्यानुसार यंदा या पुरस्कार सोहळ्याचे १८ वे वर्ष आहे. परंतु आता मागील आठवड्यात गडकरी रंगायतनाच्या खालील बाजूच्या प्रेक्षागॅलरीचा स्लॅब कोसळल्याने येथील सर्वच कार्यक्रमांना त्याचा फटका बसला आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव आता हे नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील १० दिवस दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे येथील काही कार्यक्रम घाणेकर नाट्यगृहात वर्ग करण्यात आले आहेत. तर काही कार्यक्रमांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता जनकवी पी. सावळाराम पुरस्कार सोहळ्यावरही यामुळे विरजन पडले आहे. येत्या १७ डिसेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा होणार होता. परंतु आता तो सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या सोहळ्याची तारीख अद्यापही अंतिम झाली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.