कराओके गायन स्पर्धेत प्रतिक्षा गायकवाड, संजय साळवी,सुरेश राजगुरू ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:52 PM2019-01-21T16:52:02+5:302019-01-21T16:53:40+5:30
संगीत कट्टा आयोजित फॅमिली कट्टा प्रस्तुत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त कराओके गायन स्पर्धेत सुरवीरांची जुगलबंदी रंगली.
ठाणे : ठाण्यातील अभिनय कट्टा संचलित संगीत कट्ट्यावर महाराष्टातील सुरवीरांची जुगलबंदी ठाण्यातील रसिकप्रेक्षकांनी अनुभवली.वयाची बंधन झुगारून प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी आपले संगीत कौशल्य सादर करून कराओके गायन स्पर्धेची रंगत द्विगुणित केली. कराओके गायन स्पर्धा संगीत कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्यावर आयोजित करण्यात आली होती.
सदर कराओके गायन स्पर्धेत संपूर्ण महाराष्टातून सर्व वयोगटातील ११२ स्पर्धकानी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धा वयोगट-१८ ते ३५, वयोगट- ३६ ते ५५ , वयोगट - ५६ पासून पुढे या तीन गटात घेण्यात आली. प्रत्येक गटात स्पर्धकांनी सुरांची जंग आपलं कौशल्य पणाला लावून लढवली. वयोगट-१८ ते ३५ मधून प्रतीक्षा गायकवाड-प्रथम क्रमांक ,गौरी घुले- द्वितीय क्रमांक,चेतना भागवत-तृतीय क्रमांक आणि गौरी पाटील, पंकज साळुंखे, प्रज्ञा वळंजू ह्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. वयोगट ३६ ते ५५ मधून संजय साळवी-प्रथम क्रमांक, व्यंकट राव- द्वितीय क्रमांक अरुणा हेगडे- तृतीय क्रमांक आणि मंदार जोशी,रेणुका गोगटे ,विजया प्रधान,दिपेश कुलकर्णी ह्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. अशोक गावडे ह्यांनी सादर केलेले दैवत छत्रपती ह्या गीताने विशेष पारितोषिक पटकाविले. सदर स्पर्धेत सर्वात जबरदस्त सुरांची जुगलबंदी रंगली ती अनुभवी गायकांच्या गटात वयोगट ५६ पासून पुढे मधून सुरेश राजगुरू-प्रथम क्रमांक,सुभाष पाटोळे-द्वितीय क्रमांक,प्रकाश मिराशी-तृतीय क्रमांक आणि मंगल वानखेडे, विवेक जाधव,उमेश नामजोशी,हिरेन परब ह्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.सदर गटातील ८१ वर्षांच्या हरिश्चंद्र चाचड ह्या आजोबांनी तरुणांनाही लाजवेल असे सादरीकरण करून विशेष पारितोषिक पटकाविले. सदर स्पर्धेचे परीक्षण 'चांदण फेम' गायिका भारती मढवी, ज्येष्ठ गायक अशोक चव्हाण, अभिजीत करंजकर,संगीत दिग्दर्शक आनंद मेनन ह्यांनी केले. प्रत्येक वयोगटातील गायकांना संगीत कट्ट्यासारखा रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व गायकांनी किरण नाकती ह्यांचे आभार मानले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध गायिका पुष्पा पागधरे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृहनेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, परिवहन समिती सदस्य राजू महाडिक, शिवसेना सचिव विलास जोशी, नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक भास्कर पाटील, दिपक म्हस्के, राजेश तावडे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. भारती मढवी ह्यांनी गायलेल्या बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे गीताने उपस्थित प्रेक्षक गहिवरून गेले.