पूर्ववैमनस्याचे सूडचक्र उठले जीवावर, राष्ट्रवादीमुळे गुन्हा : दोघांवरही गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 02:43 AM2017-12-23T02:43:28+5:302017-12-23T02:43:40+5:30
आडिवली-ढोकळी प्रभागातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याने भाजपाचे अंबिकानगरचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह अन्य सात ते आठ जणांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्याचे सूडचक्र कोणत्या पातळीवर येऊन ठेपले ते भाजपाच्या नेत्यांना समजले.
कल्याण : आडिवली-ढोकळी प्रभागातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याने भाजपाचे अंबिकानगरचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह अन्य सात ते आठ जणांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्याचे सूडचक्र कोणत्या पातळीवर येऊन ठेपले ते भाजपाच्या नेत्यांना समजले.
कुणाल पाटील हे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वंडार पाटील यांचे पुतणे आहेत. कुणाल हे अपक्ष नगरसेवक आहेत. परंतु त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपाला पाठिंबा दिल्याने त्यांची भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक म्हणून ओळख आहे. कुणाल आणि महेश पाटील यांच्यात पूर्वीपासून वैर आहे. कुणाल यांचा चुलत भाऊ, वंडार पाटील यांचा मुलगी विजय याची २००७ मध्ये हत्या झाली होती. यात महेश पाटील यांचा आरोपी म्हणुन सहभाग होता. याप्रकरणी महेश यांच्यासह अन्य त्यांच्या साथीदारांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेला काही वर्षे उलटत नाही तोच महापालिकेच्या नोव्हेंबर २०१५ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीआधी जुलै महिन्यात ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने आठ जणांना अटक केली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले शार्पशूटर्स सागर्ली गावात राहणारे आणि भाजपाचे तत्कालीन ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांची हत्या करण्यासाठी आले होते, अशी माहिती तपासात उघड झाली. पोलिसांनी या आरोपींकडून चार रिव्हॉल्वर हस्तगत केली होती. या हत्येची सुपारी कुणाल पाटील यांनी दिली होती, अशी कबुली अटक आरोपींकडून पोलिसांना देण्यात आली होती. या प्रकरणात कुणाल यांना अटकही झाली होती. आता पुन्हा एकदा महेश पाटील यांनी कुणालच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
भाजपातून दबाव?
महेश पाटील भाजपा नगरसेवक आहेत. एका मंत्र्याच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत साशंकता होती. त्याच पक्षाकडे असलेल्या गृहखात्यातून पोलिसांवर दबाव असल्याचे सांगितले जात होते. मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वंडार पाटील आणि भाऊ सुधीर पाटील यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना यांना सांगताच गुन्हा दाखल करणे ग्रामीण पोलिसांना भाग पडल्याची चर्चा आहे.
पाटील कुटुंबांना
पोलीस संरक्षण
माझ्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले असले तरी आमच्या कुटुंबालाच संपवायची हल्लेखोरांची योजना होती असे कुणाल पाटील यांचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि स्थानिक मानपाडा पोलिसांनी आम्हाला पुरेसा बंदोबस्त पुरविला आहे. अटकेतील हल्लेखोर आणि कट रचणाºयांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.