ठाणे कारागृह लवकरच सुरू करणार कैद्यांचाही पेट्रोलपंप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:25 AM2017-07-18T02:25:08+5:302017-07-18T02:25:08+5:30
ठाणे शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पेट्रोलपंपांची संख्या खूपच कमी आहे. हे पंप मोजक्या आणि मोक्याच्या ठिकाणी आहेत. अशाच एका मोक्याच्या
- प्रज्ञा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पेट्रोलपंपांची संख्या खूपच कमी आहे. हे पंप मोजक्या आणि मोक्याच्या ठिकाणी आहेत. अशाच एका मोक्याच्या ठिकाणी आणखी एका पेट्रोल पंपाची भर पडणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह लवकरच पेट्रोल पंप सुरू करीत आहे आणि मध्यवर्ती कारागृहातील खुले बंदी या पंपावर काम करणार आहेत. शिवाय याच पंपालगत गाड्यांचे वॉशिंग सेंटरही सुरू करण्यात येणार आहे.
कारागृहातील बंद्यांच्या हातांना काम मिळावे, त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे आणि शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांना सामान्यांसारखे आयुष्य जगता यावे, यासाठी या बंद्यांसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकी एक म्हणजे बंदींचा पेट्रोल पंप. ती लवकरच प्रत्यक्षात येईल.
शिक्षा भोगल्यानंतर बंदींना बंद कारागृहातून खुल्या कारागृहात आणले जाते. त्यांना खुले बंदी म्हणतात. याच बंदींवर या पेट्रोल पंपांची जबाबदारी देण्यात येणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात असे खुले कारागृह दीड ते दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. त्यात २५ ते ३० बंदी आहेत.
सुरूवातीला या पेट्रोल पंपावर दोन युनिट असतील. या ठिकाणी चार ते पाच खुल्या बंदींची, तर पैशांचा हिशोब सांभाळण्यासाठी दोन शिपायांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती कारागृह अधिक्षक नितीन वायचळ यांनी ‘लोकमत’ला दिली. सुरूवातीला सकाळी ८ ते सायं. ७ वाजेपर्यंत हा पेट्रोल पंप सुरू असेल. त्यात बंद्यांना तासाभराची जेवणाची सुट्टी देण्यात येईल. पेट्रोल पंपासाठी अद्याप जागा निश्चित करण्यात आली नसली; तरी साकेत रोड किंवा जेल तलावाच्या परिसरात तो सुरू करण्याचा मानस आहे. यापूर्वी पेट्रोल पंप सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु त्या प्रक्रियेला ब्रेक लागला होता. त्यामुळे पुन्हा या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू आहे. हा पंप याचवर्षी सुरू करण्याचा विचार आहे. पेट्रोल पंपाबरोबरच वाहने धुण्यासाठी वॉशिंग सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. जवळपास दहा खुल्या बंदींवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
- वाहने दुण्यासाठीची ही सुविधा सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत आणि मध्ये तासभर जेवणाची सुट्टी या वेळेत असेल. हे सेंटर पेट्रोल पंपालगतच असेल. त्याची व्यवस्था पाहणारे खुले बंदी पळून जाण्याची शक्यता नसते, म्हणूनच त्यांची या कामी नेमणूक करण्यात येणार असल्याचे नितीन वायचळ म्हणाले.