नागरीकांच्या अभिरुप महासभेतून आयुक्तांचा सभात्याग, विरोधी पक्षनेत्यांनी मांडला बदलीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 03:35 PM2018-11-28T15:35:19+5:302018-11-28T15:37:28+5:30
सलग दुसऱ्या दिवशी ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीने अभिरुप महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्या बदलीचा प्रस्ताव मांडला. परंतु आयुक्तांनी याचा निषेध नोंदवित सभात्याग केला.
ठाणे - ठाणेमतदाता जागरण अभियान आयोजित नागरिकांच्या अभीरूप महासभेत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्या बदलीचा प्रस्ताव मांडला. तो तत्काळ महापौरांकडून स्विकारण्यात आला. परंतु आयुक्तांनी यावेळी निषेध नोंदवित सभात्याग केला.
ठाणे महानगरातील नागरिकांच्या समस्या जनतेसमोर मांडण्याकरता या अभिरूप महासभेचे आयोजन करण्यात आले होते. हे कोणतेही नाटक नव्हते तर प्रश्न मांडण्याची नवी पद्धत असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे झालेल्या महासभेत विरोधीपक्ष नेत्यांनी हा प्रस्ताव मांडला.आयुक्तांची साडेतीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या संपूर्ण कारर्कीदीत त्यांनी अत्यंत धडाकेबाज कामे व प्रकल्प पूर्ण केले हे मान्य करावेच लागेल. त्यांनी सुरू केलेल्या प्रशासकीय सुधारणा व आणलेली गती ही आनंदाची बाब असली व सर्व साधारणपणे त्याचे कौतुक होत असले तरी प्रशासनातील वाढलेला भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहार ही देखील चिंताजनक बाब असल्याचे स्पष्ट केले. रस्ते दुरु स्ती व खड्डे बुजवणे ही त्याची उदाहरणे असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रो केवळ बिल्डरांचे फ्लॅट विकण्यासाठी बांधली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. असे अनेक मुद्दे उपस्थित करीत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार नियमानुसार आयुक्तांची बदली करावी तसेच त्यांच्या साडे तीन वर्षाच्या कारभाराची चौकशी करावी असा प्रस्ताव त्यांनी सभागृहासमोर मांडला. या भाषणा दरम्यान वेळोवेळी सत्ताधारी पक्षांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु महापौरांनी मात्र त्यांना समज देऊन गप्प केले.
सभागृह नेत्यांनी या प्रस्तावाला विरोध करताना आयुक्तांचे जोरदार समर्थन करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तानीही आपली बाजू मांडली, ते म्हणाले,’’या सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रस्ताव चर्चेकरता मांडला आहे, तो आश्चर्यकारक व काहीसा राजकीय भूमिकेतून मांडला आहे. मी राज्य शासनाचा प्रतिनिधी असून याबाबत जे नियम, कायदे व प्रथा आहेत त्या मलाही लागू आहेत. त्यामुळे शासनाने माझी बदली केली तर ती मी नाकारू शकत नाही. तसेच तीन वर्षे पूर्ण झाली आता माझी बदली करा अशी मागणीही करू शकत नाही. याबाबत शासन जो निर्णय घेईल तो मला मान्य असेलच. पण माझी बदली करा असे सांगताना विरोधी पक्ष नेत्यांनी गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे जे आरोप केलेत ते मला पूर्णपणे अमान्य असल्याचे सांगितले. तसेच मी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांनी विरोधी पक्षाने केलेल्या निवेदनाच्या विरोधाता निषेध नोंदवित सभात्याग केला.