रेल्वेत हरवलेली दागिन्यांची बॅग पुन्हा महिलेच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:45 AM2019-05-26T05:45:34+5:302019-05-26T05:45:38+5:30
रेल्वे प्रवासात हरवलेली पनवेल येथील महिलेची बॅग तिला पुन्हा मिळाली आहे.
ठाणे : रेल्वे प्रवासात हरवलेली पनवेल येथील महिलेची बॅग तिला पुन्हा मिळाली आहे. मुंब्रा आरपीएफच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही बॅग परत मिळाली असून त्यामध्ये दोन लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने होते.
शुक्रवारी दुपारी मुंब्रा रेल्वेस्थानकात आरपीएफचे कर्मचारी गस्त घालत असताना स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर एक बॅग असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बॅगेत सोन्याचे दागिने होते. बॅग ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यानंतर एका महिलेने बॅग ओळखली.
ही महिला शीळफाटा येथून मुंब्रा येथे रिक्षातून येत असताना तिच्याशेजारी बसलेल्या महिलेची बॅग असल्याची माहिती तिने आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना दिली. या महिलेला सोबत घेऊन आरपीएफने रिक्षाचालकाचा शोध सुरू केला.
हा रिक्षाचालक स्थानकाबाहेर भाड्याची प्रतीक्षा करत उभा होता. महिलेने रिक्षाचालकाला ओळखल्यानंतर या बॅगेविषयी शीळफाटा येथे कोणी चौकशी करत आहे का, याबाबत तेथील रिक्षाचालकांकडे विचारपूस करण्याविषयी आरपीएफने त्याला सांगितले. यात एक व्यक्ती तिकडे चौकशी करत असल्याची बाब समोर आली. त्यानुसार, आरपीएफच्या अधिकारी, कर्मचाºयांनी शीळफाटा येथे धाव घेतल्यानंतर जनार्दन गोंधळी हे या बॅगेचा शोध घेत असल्याचे दिसून आले. नेमकी बॅग हरवली कोठे, याबाबत काहीच समजत नव्हते. आरपीएफने ही बॅग मुंब्रा रेल्वेस्थानकात मिळाली असल्याची गोंधळी यांना माहिती दिली.
गोंधळी यांची पत्नी निर्मला (५०), रा. तळोजा, पनवेल या शुक्रवारी दिव्याला निघाल्या होत्या. रिक्षाने मुंब्रा येथे आल्यानंतर दागिन्यांची बॅग मुंब्रा रेल्वेस्थानकात विसरल्या होत्या. मात्र, आरपीएफच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे गोंधळी यांना बॅग पुन्हा मिळाली. मुंब्रा आरपीएफ कार्यालयात बोलावून घेऊन ती बॅग निर्मला यांच्या स्वाधीन केल्याची माहिती आरपीएफचे उपनिरीक्षक ए.के. यादव यांनी दिली.