पावसाने घेतली सुटी! दिवसभर तुरळक सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:52 AM2018-06-11T03:52:32+5:302018-06-11T03:52:32+5:30
ठाणे जिल्ह्याच्या शेजारी तुफान पाऊस सुरू असताना ठाण्यात मात्र रविवारी पावसाने सुटी घेतली.
ठाणे : जिल्ह्याच्या शेजारी तुफान पाऊस सुरू असताना ठाण्यात मात्र रविवारी पावसाने सुटी घेतली. त्या आधी रात्री कोसळलेल्या पावसामुळे मात्र सिव्हील रुग्णालयाच्या मागच्या बाजूला काही खिडक्यांचा स्लॅब रविवारी दुपारी निखळून पडल्याची घटना घडली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
ठाणे शहरात रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत केवळ ९ मिमी पावसाच्या सरी पडल्या. मात्र, २४ तासांच्या कालावधीत सकाळी ८ वाजेपर्यंत २१६ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली. यामध्ये भिवंडीत सर्वाधिक ७१ मिमी, तर कल्याणला २४, मुरबाडला २, उल्हासनगरला ५, अंबरनाथला ७.८ आणि शहापूरला २० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.यादरम्यान आसनगावच्या कंपनीच्या आगीची घटनावगळता जिल्ह्यात अन्यत्र कोठेही अनुचित घटना घडली नाही. मात्र, रविवारी दुपारी सिव्हील रुग्णालयाच्या मागील बाजूचा स्लॅब निखळून पडल्याची घटना घडली.
ठाणे शहरातील प्रताप सिनेमाजवळील झाड उन्मळून पडले. रात्रीपासून ठिकठिकाणी ४२ झाडे पडली. पाचपाखाडीच्या प्रशांत कॉर्नरजवळ झाडे धोकादायक स्थितीत झुकले आहे. शहरात एका आगीच्या घटनेसह १५ झाडे धोकादायक स्थितीत झुकले आहेत.