तर केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा, संघाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 03:22 PM2018-10-29T15:22:26+5:302018-10-29T18:29:57+5:30

रामाचा जन्म सध्याच्या रामजन्मभूमीतच झाला असून तेथेच राममंदिर बनेल मात्र त्याचा निर्णय साधुसंत घेतील, त्यांच्या सोबत संघ असेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय संघ प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी सोमवारी केशवश्रुष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.     

Ram Janmabhoomi's decision will be taken by the saints | तर केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा, संघाची भूमिका

तर केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा, संघाची भूमिका

Next

 भाईंदर - रामाचा जन्म सध्याच्या रामजन्मभूमीतच झाला असून, तेथेच राममंदिर बनेल मात्र त्याचा निर्णय साधुसंत घेतील, त्यांच्या सोबत संघ असेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय संघ प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी सोमवारी केशवश्रुष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. रामजन्मभूमीत श्रीरामांचे भव्य मंदिर लवकरात लवकर उभे राहिले पाहिजे. त्यादृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय तातडीने द्यावा. तसेच काही अडचणी असतील तर सरकारने कायदा करून मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करावा, असे सांगत अरुण कुमार यांनी राम मंदिराबाबतची संघाची भूमिका स्पष्ट केली. 

रामजन्मभूमीत पूर्वी राममंदिरच होते, त्यावर कोणीतरी इतर बांधकाम केले. त्यातून रामजन्मभूमी रामाचीच असल्याचे सिद्ध झाले असले तरी सध्या जागेचा वाद निर्माण झाला आहे, तो न्यायालयाने लवकर सोडवावा अन्यथा केंद्र सरकारने त्यावर कायदा बनवून राममंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा करावा, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. राममंदिराच्या निर्मितीसाठी संघ आग्रही आहे. मात्र त्याचा निर्णय रामभक्त साधुसंत घेतील आणि आम्ही त्यांच्या सोबत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक केशवश्रुष्टी येथेच आयोजित करण्यात आली असून त्यात होणाऱ्या विचारांवर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संघाचे देशात 11 क्षेत्रे असून 43 प्रांत आहेत. या बैठकीत एकूण 7 विविध संघटनांचे सर्व कार्यवाहक, संघटक सचिव, प्रचारप्रमुख आदी सहभाग घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीत कार्यकर्ता प्रशिक्षणासह त्यांच्या कार्यक्षमतेवर तसेच  संघबांधणीवर विचार होणार असून त्यांच्या गुणात्मक विचारांवर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत संघातील समस्यांवरही चर्चा केली जाणार असून अंतर्गत समस्यांचे निराकरण बैठकीत केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राममंदिराच्या निर्माणावरही बैठकीत चर्चा होणार असून देशात चाललेल्या घडामोडींवरही विचारविमर्श केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Ram Janmabhoomi's decision will be taken by the saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.