राणे, मुंडेंचा नातेवाईक असल्याचे सांगून गंडा; रेल्वे अधिका-याकडून उकळले ७२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:48 AM2018-01-09T01:48:11+5:302018-01-09T01:48:17+5:30
कुणाला काँग्रेस नेते नारायण राणेंचा जावई, तर कुणाला मंत्री पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ असल्याच्या थापा मारून कोट्यवधी रुपयांना लुबाडणा-या सिंधुदुर्गच्या एका महाठगास ठाणे पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. एकापाठोपाठ तीन लग्ने करून त्याने महिलांचीही फसवणूक केली आहे.
ठाणे : कुणाला काँग्रेस नेते नारायण राणेंचा जावई, तर कुणाला मंत्री पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ असल्याच्या थापा मारून कोट्यवधी रुपयांना लुबाडणा-या सिंधुदुर्गच्या एका महाठगास ठाणे पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. एकापाठोपाठ तीन लग्ने करून त्याने महिलांचीही फसवणूक केली आहे.
‘शादी डॉट कॉम’वरून परिचय झालेल्या एका इसमासोबत विवाह केल्यानंतर त्याने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार कळवा पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी आली होती. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इर्शाद सय्यद यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासादरम्यान आरोपी अभय वामन गवत (४२) याचे एकापेक्षा एक किस्से समोर आले. त्याने पहिल्या पत्नीला सोडून, दोन अपत्ये असलेल्या एका महिलेशी दुसरा विवाह केला. तिच्याकडून पैसे उकळल्यानंतर तिसरे लग्न केले. तिच्यासह तिच्या नातेवाईकांकडूनही त्याने पैसे उकळले. कळवा पोलीस ठाण्यात आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यापासून तो फरार होता. मधल्या काळात तो मोबाइल बंद करून राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत होता. आपण म्हाडाचे अधिकारी असल्याचे सांगून घर मंजूर करण्याच्या नावाखाली आरोपीने काही लोकांकडून पैसे उकळले आहेत. कुणाला काँग्रेस नेते नारायण राणेंचा जावई, तर कुणाला महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ असल्याचे सांगून तो पैसे उकळायचा. तो वसई येथे असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस उपनिरीक्षक सय्यद इर्शाद यांना मिळताच रविवारी सापळा रचून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
- वृद्धाश्रम सुरू करण्याच्या नावाखाली अभय गवत याने मुंबईच्या रेल्वे अधिकाºयाला ७२ लाखांना गंडा घातला.
आरोपीने या अधिकाºयास वृद्धाश्रमासाठीची जागाही दाखवली होती.
प्राथमिक स्तरावर पोलिसांनी या रेल्वे अधिकाºयावरही संशय व्यक्त केला आहे. आरोपीने केलेल्या एकूण फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाईल, असा संशय पोलिसांना आहे.