विक्री अन् उत्पादनाचे बनावट प्रमाणपत्र बनवून झाली स्क्रॅप वाहनांची नोंदणी

By जितेंद्र कालेकर | Published: September 28, 2018 10:56 PM2018-09-28T22:56:15+5:302018-09-28T23:01:44+5:30

Registration of scrap vehicles made of fake certificates of sale and production | विक्री अन् उत्पादनाचे बनावट प्रमाणपत्र बनवून झाली स्क्रॅप वाहनांची नोंदणी

भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई

Next
ठळक मुद्देफॉर्म क्र. २१ आणि २२ बनावट प्रमाणपत्र बीड आरटीओ मध्ये झाली नोंदणी भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई






एखादे नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याच्या आरटीओमध्ये नोंदणीसाठी वाहनाचे विक्री प्रमाणपत्र (फॉर्म २१) आणि उत्पादित (मॅन्युफॅक्चरचा फॉर्म क्र. २२) हे दोन्ही आरटीओकडून पाहिले जाते. याच फॉर्मचे बनावट प्रमाणपत्र बनवून वाहनांची नोंदणी बीडमध्ये करण्यात आली.


जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विक्रीसाठीचा फॉर्म क्र. २१ आणि वाहन उत्पादनाचे २२ क्रमांकाचे प्रमाणपत्र देणार नसल्याचे टाटा मोटार्सकडून स्पष्ट केले होते. त्यामुळेच २१ आणि २२ क्रमांकाचे बनावट प्रमाणपत्र बनवून बीड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) स्क्रॅपमधील शेकडो वाहनांची नोंदणी झाल्याचे भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात उघड झाले आहे.

एखादे नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याच्या आरटीओमध्ये नोंदणीसाठी वाहनाचे विक्री प्रमाणपत्र (फॉर्म २१) आणि उत्पादित (मॅन्युफॅक्चरचा फॉर्म क्र. २२) हे दोन्ही आरटीओकडून पाहिले जाते. ही दोन्ही प्रमाणपत्रे दिली जाणार नसल्याचे टाटा मोटार्सकडून स्पष्ट करण्यात आले होते. स्क्रॅप वाहने विक्री करताना काढलेल्या निविदेमध्येही त्यांनी तसे म्हटले होते. त्यानंतर, या कंपनीकडून स्क्रॅप वाहने खरेदी करणारा सचिन सोनवणे आणि बीड आरटीओ कार्यालयातील दलाल यांनी शक्कल लढवून हे २१ आणि २२ क्रमांकांचे दोन्ही फॉर्म बनावट तयार केले. त्याच आधारे सुरुवातीला त्यांनी काही व्यावसायिक वाहनांची नोंदणी केली. त्यानंतर, प्रवासी वाहने विकली. ती विकली गेल्यानंतर त्यांची हिम्मत वाढली. पुढे त्यांनी चक्क एका स्कूलबसचीही नोंदणी केली. अशी बीड आरटीओ कार्यालयातूनच अनेक वाहनांची नोंदणी झाल्याचे आढळल्यावर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने या कार्यालयातील संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा आठ मोठी प्रवासी वाहने, एक स्कूल बस अशी ३४ वाहने त्यांनी जप्त केली. देशभरात अशा ४२८ वाहनांची नोंदणी केल्याचेही आढळले आहे. साधारण २०११ पासून हा प्रकार अव्याहतपणे सुरू होता. बीडमध्ये नोंदणी झाल्यानंतर परराज्यांत वाहन नेण्यासाठीही दिली जाणारी ‘एनओसी’ याच कार्यालयातून दिली जाऊ लागली. त्यामुळे परराज्यात गेलेल्या अशा किती वाहनांना बीडमधून एनओसी दिल्या गेल्या, याचाही आता शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात आता आणखीही काही आरटीओ अधिकारी आणि दलाल अडकण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
..................
त्रुटी असूनही देशभरातील ४८१ वाहने रस्त्यावर
धावत असून त्यापैकी ४२८ खासगी तर ५३ प्रवासी वाहने आहेत. ४२८ खासगी वाहनांपैकी महाराष्ट्रात ३६ (यातील २४ वाहने जप्त आहेत.) गुजरात ७२, हिमाचल प्रदेश ७, हरियाणा २४, झारखंड ६, मध्यप्रदेश ९, मिझोराम ३, नागालँड २१, ओरीसा १, पंजाब २३, राजस्थान ३९, सिक्कीम १, उत्तरप्रदेश ४४, पश्चिम बंगाल ३७, आसाम ४, छत्तीसगड ८, गोवा १, दिल्ली ७, जम्मू कश्मीर १, मणिपूर १, मेघालयात वाहनांचा समावेश आहे. तर ५ प्रवासी वाहनांमध्ये महाराष्ट्र २१ (१० वाहने जप्त), गुजरात ११, हरियाणा ४, उत्तरप्रदेश ६, राजस्थान २, मध्यप्रदेश ७, उत्तराखंड १, नागालँड १ वाहनांचा समावेश आहे, या सर्व वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केलेली आहे.

------------------

Web Title: Registration of scrap vehicles made of fake certificates of sale and production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.