घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरु नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:52 PM2017-10-25T15:52:19+5:302017-10-25T15:59:51+5:30
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून अघोषीत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या फेऱ्यांना फटका बसला आहे. आता या फेऱ्या थेट मुंबईला होणार असून थिएटरच्या दुरुस्तीला मात्र अद्यापही सुरवात झालेली नाही.
ठाणे - घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर मुख्य थिएटर आॅगस्ट महिन्यात सुरु झाले असतांनाच मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून अघोषीत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारे बालनाट्य स्पर्धा, विविध कार्यक्रम, राज्य नाट्य स्पर्धांच्या फेऱ्यांना फटका बसला आहे. राज्य नाट्य स्पर्धांच्ये फेऱ्या थेट मुंबईला हलविण्यात आल्या आहेत. दुरुस्तीच्या कारणासाठी हे थिएटर बंद ठेवण्यात आले असले तरी त्याचे काम मात्र अद्यापही सुरुच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दुरुस्तीसाठी अद्याप बजेट देखील उपलब्ध झालेला नाही.
डॉ. काशिनाथ घाणेकर या नाट्यगृहाची नुकतीच डागडुजी करण्यात आली होती. मुख्य नाट्यगृहाचे सीलींग कोसळल्याने, हे नाट्यगृह मागील सुमारे दिड वर्षे बंद होते. त्यानंतर २९ आॅगस्टपासून या नाट्यगृहाचा पडदा पुन्हा उघडला आहे. परंतु त्यानंतर आता याच ठिकाणी असलेले मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. परंतु यामुळे या ठिकाणी होणाºया अनेक कार्यक्रमांना याचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे मागील दिड वर्षे या नाट्यगृहाची डागडुजी सुरु असतांना पालिकेला या मिनी थिएटरची डागडुजी करता आली नाही का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. आता कुठे नाटयगृह सुरु झाले असतांना पुन्हा मिनी थिएटर बंद करण्यात येत असल्याने अनेक संस्थांचा हिरमोड झाला आहे.
या संदर्भात पालिकेच्या संबधीत विभागाशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, मिनी थिएटरमध्ये गळती सुरु झाली आहे. ही गळती नेमकी कशामुळे होत आहे, याचे कारण अद्याप सापडू शकलेले नाही. त्यामुळे ही गळती शोधण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी हे मिनी थिएटर बंद ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
परंतु मिनी थिएटर बंद पडत असल्याने त्याचा फटका, अनेक छोटे मोठे आॅकेस्ट्रांचे कार्यक्रम, बालनाट्य महोत्सव, राज्य नाट्य स्पर्धा आदींसह दिवाळी पहाट, आदींसह इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांना बसला आहे. हौशी राज्य नाट्यस्पर्धांच्ये फेºया देखील या ठिकाणी आता होणार नसून त्या मुंबईला हलविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठाण्यातील रंगकर्मींची घोर निराशा झाली आहे. या थिएटरकडून पालिकेला वार्षिक ७५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. असे असले तरी देखील, दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या या नाट्यगृहाच्या कामाला मात्र अद्यापही सुरवातच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या दुरुस्तीच्या कामासाठी किती खर्च होऊ शकतो याचा देखील अंदाज संबधीत विभागाला बांधता आलेला नाही. असे असतांना देखील आज २५ दिवसानंतरही या मिनी थिएटरच्या दुरुस्तीच्या कामला मात्र सुरुवात झालेली नाही. दरम्यान आता या दुरुस्तीच्या कामाला १ कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती संबधींत विभागाने दिली असून त्यासाठी येत्या काही दिवसात बजेट उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येऊन कामाला सुरवात केली जाणार आहे. परंतु यासाठी देखील आणखी दिड ते दोन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता पालिका सुत्रांनी वर्तविली आहे.