कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायटींना पुन्हा तारीख पे तारीख, महापालिका बजावणार पुन्हा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:08 PM2018-05-03T17:08:48+5:302018-05-03T17:08:48+5:30
सहा महिने उलटूनही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोसायटी धारक पुढे येत नसल्याने, पालिकेने पुन्हा एकदा या सोसायटीधारकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निश्चित केले आहे. तसेच या संदर्भातील प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे.
ठाणे - शहरातील सोसायटींनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारची जनजागृती करण्यात आली. परंतु त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायटींनी त्यावर अद्याप अमल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पालिकेने मे महिन्यापासून शहरातील सोसायटींचा कचरा न उचलण्याची भुमिका घेतली होती. परंतु आता पुन्हा पालिकेने घुमजाव करीत या सोसायटीधारकांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कचरा उचलणे बंद न करता नोटीसा बजावण्याची कारवाई पुन्हा एकदा केली जाणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार स्थानिक पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी निदान या सोसायटी कचरा प्रक्रि येसाठी पुढाकार घेतील असा विश्वास पालिका प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. कचऱ्यावर प्रक्रि या करण्यासाठी सोसाट्यांमध्ये असलेला संभ्रम आणि महापालिकेनेच कचऱ्यावर प्रक्रि या करण्यासाठी एखादी एजन्सी नेमून द्यावी या प्रतीक्षेत काही सोसायटी असल्याने अजूनही बहुतांश सोसायट्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यास सुरु वात केलेली नाही. यासाठी पालिकेने प्रदर्शन देखील भरविले होते. परंतु त्याला देखील फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
ठाण्यातील १ हजारांपेक्षा अधिक सोसायटीना ठाणे महापालिकेच्या वतीने यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आल्या असून ज्या सोसायट्यांचा, मॉल तसेच हॉस्पिटलचा दररोजचा कचरा १००० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. तसेच ज्या सोसायट्यांचे क्षेत्रफळ ५ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, अशा सोसायट्यांना स्वत:च कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरवातीला ठाणे महापालिकेच्या वतीने कचºयाची विल्हेवाट लावण्याचे आवाहन देखील करण्यात आले. मात्र तरीही सोसायट्यांचा प्रतिसाद न आल्याने काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या वतीने अशा सोसायट्यांच्या कचरा उचलणे बंद केले होते. त्यानंतर या सोसायट्यांना मार्च पर्यंत कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीमध्येच लावण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र आता केवळ ८ ते १० टक्के सोसायटींनी या प्रक्रि येला सुरु वात केलेली आहे. त्यामुळे उर्वरीत सोसायटींचा कचरा मे पासून न उचलण्याचे पालिकेने निश्चित केले होते. परंतु पालिकेने पुन्हा एक पाऊल मागे येत, या सोसायटींना नोटीसा बजावण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच मे च्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा प्रदर्शन भरविण्याचे निश्चित केले आहे.