रिंग रोड : जमीन संपादनासाठी लवकरच बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:42 AM2018-06-15T04:42:07+5:302018-06-15T04:42:07+5:30
कल्याण शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएकडून बांधण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याची पाहणी केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी केली.
कल्याण - शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएकडून बांधण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याची पाहणी केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी केली. या रस्त्यासाठी जमीन देण्यास काहींचा विरोध आहे. मात्र, त्यासंदर्भात विशेष बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.
रिंग रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दुर्गामाता चौक ते टिटवाळा हा २० किमी लांबीचा रस्ता केला जाणार आहे. दुसºया टप्प्यात १३ किमी लांबीचा दुर्गामाता चौक ते माणकोलीपर्यंतचा रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्यामुळे शहरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. तर, पुढील टप्प्यात २७ गावांना जोडणारा रस्ता तयार केला जाणार आहे.
दरम्यान, गुरुवारी आयुक्त बोडके आणि एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी टिटवाळा आणि आजूबाजूच्या भागांचा दौरा केला. या दौºयात शहाड, वडवली, आंबिवली, अटाळी, मांडा, बारावे ते उल्हास नदीच्या पलीकडच्या भागाला भेट देऊन पाहणी केली. काही जागा ताब्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कामही सुरू केले आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध होत आहे. त्यांच्याशी बैठकीद्वारे चर्चा करून निर्णय घेऊ, असे बोडके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ग्रामीण भाग जोडणार
कल्याण-डोंबिवली, टिटवाळा व ग्रामीण भाग एकमेकांशी जोडण्यासाठी शहराबाहेरून जाणाºया रिंग रोडचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे. एमएमआरडीए हा रस्ता बांधत आहे. मात्र, यासाठी लागणारी जागा महापालिकेने संपादित करून द्यायची आहे.