शनिवारच्या सायंकाळी सहयोग मंदिरात रंगला स्वर सुमनेचा प्रकाशन सोहळा आणि विविध वाद्यांची अद्वितीय मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 04:27 PM2018-05-06T16:27:04+5:302018-05-06T16:27:04+5:30
संस्कार प्रकाशन आयोजित स्वरसुमन माला हा सुप्रसिदध संवादिनी वादक पं. प्रकाश चिटणीस यांच्या “स्वरसुमने” या पुस्तकातील गत-रचनावर आधारित विविध वाद्यांची सुरेल मैफल शनिवारी सहयोग मंदिर येथे संपन्न झाली.
ठाणे : पं. प्रकाश चिटणीस यांच्या खास वाद्य संगीतासाठी गायकी ढंगाच्या गत रचनांचे पुस्तक - स्वर सुमने- ह्याच्या प्रकाशननिमित्त सारंगी, बासरी, व्हायोलिन, इलेक्ट्रिक मँडोलीन आणि संवादिनी अशा विविध वाद्यांची एक अप्रतिम मैफल घडवून आणली.
पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणे होते सुप्रसिद्ध गायक व शास्त्रीय संगीतावर अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिणारे पं. किरण फाटक, ख्यातनाम संवादिनी वादक डॉ. दिलीप गायतोंडे आणि प्रति बिस्मिल्ला खान म्हणून ओळखले जाणारे पं. शैलेश भागवत. संस्कार प्रकाशनाच्या प्रसाद कुलकर्णी यांनी आपण शास्त्रीय संगीताच्या आवडीमुळे संगीत विषयक पुस्तके प्रकाशनाच्या क्षेत्राकडे ओढले गेलो असं सांगून गेल्या १८ वर्षातील आपल्या प्रकाशनाच्या अनुभवात केवळ वाद्य संगीतसाठीच्या गत रचनांचे पुस्तक प्रथमच प्रसिद्ध केले असे सांगितले. अशा तऱ्हेची पुस्तके लिहिली जाणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे आणि प्रकाशजींसारख्या उत्कृष्ट संवादिनी वादक कलाकाराचे पुस्तक प्रसिद्ध करायला मिळाले ही मोठी भाग्याची गोष्ट आहे नमूद केले. प्रमुख पाहुणे पं किरण फटकांनी वाद्य संगीतासाठी अशा तऱ्हेचे हे पहिलेच पुस्तक आपल्या पाहण्यात आले असून पं प्रकाशजींचे अभिनंदन केले. संगीताविषयी सखोल चिंतन असल्याखेरीज अशा गत रचना सुचत नाहीत असे सांगत एक त्या मागच्या असणाऱ्या तपश्चर्ये विषयी/ रियाझ विषयी एक सुंदर कविता सादर केली. डॉ दिलीप गायतोंडे , ज्यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे त्यांनी पण पुस्तकाचे वेगळेपण अधिरेखीत केले. पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाल्यावर मग श्रोते सुरांच्या मधुर बरसातीमध्ये न्हाऊन गेले. सर्व कलाकारांनी प्रकाशजींच्याच गत रचना सादर केल्या. प्रसाद पटवर्धनच्या सारंगी वादनाने सुरुवात झाली, आपल्या पहिल्याच वादनात त्यांनी राग मुलतानी सादर करून श्रोत्यांच्या मनाची पकड घेतली आणि मग डॉ हिमांशूने बासरीवर राग पटदीप सादर करून श्रोत्यांना गुंगवून टाकले. मोहन पेंडसे यांनी व्हायोलिन आणि इलेक्ट्रिक मँडोलीन राग जोग वाजवून सगळ्यांची मने जिंकली. चढती कमान झाली स्वतः प्रकाशजींच्या हंसध्वनी आणि पूर्वी रागाच्या सादरीकरणाने. अगदी काही मिनिटात त्यांनी पूर्ण राग उभा केला आणि श्रोत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पूर्वीची गत तर अगदी वेगळ्या ढंगाची होती आणि विजेच्या वेगाने चालणारी त्यांची बोटे, आणि तरी सुद्धा वादनात असलेली नजाकत रसिकांना मोहवून गेली. ह्या सुरेल मैफिलचा कळस झाला प्रकाशजी व मोहन पेंडसे यांच्या यमन रागातील एक रचनेच्या सहवादानाने. सतत साडेतीन चाललेला हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते. रात्री ९.३० पर्यंत चाललेल्या ह्या केवळ शास्त्रीय संगीताच्या मैफलीला मिळालेली दाद अवर्णनीय होती आणि त्याच बरोबर तितकीच कसदार निर्मिती असेल तर श्रोतेही मंत्रमुग्ध होतात याचा पुनः प्रत्यय आला. कार्यक्रमाचे अत्यंत रोचक निवेदन नरेंद्र बेडेकर यांनी केले. पुष्कराज जोशी यांनी सर्व कलाकारांना तबल्याची अतिशय उत्तम साथ केली ज्यामुळे वादन अधिक आनंददायी झाले.