विज्ञान प्रदर्शन : रेल्वेप्रमाणे अनाउन्समेंट अथवा फाटकाचा रस्त्यांवरही असावा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:39 AM2017-12-09T01:39:41+5:302017-12-09T01:39:56+5:30
सिग्नलवर राहणा-या आणि सिग्नल शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या या मुलांनी तयार केलेला ‘स्मार्ट सिग्नल’ हा विज्ञान प्रकल्प महापालिका शिक्षण विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात सादर झाला
स्नेहा पावसकर
ठाणे : सिग्नलवर राहणा-या आणि सिग्नल शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या या मुलांनी तयार केलेला ‘स्मार्ट सिग्नल’ हा विज्ञान प्रकल्प महापालिका शिक्षण विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात सादर झाला असून तो अनेकांची पसंती मिळवतो आहे. सिग्नलवर राहत असताना तेथील समस्या, अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजना का नाही, अशा प्रकारच्या मुलांच्या विचारातूनच हा प्रकल्प साकारला आहे.
ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांचा विज्ञान प्रदर्शन सोहळा कळवा येथील शाळा क्र. ६९, ७० मध्ये शुक्रवारपासून सुरू झाला आहे. या प्रदर्शनात अनेक शाळांचे प्रकल्प असून लक्षवेधी ठरत आहे, तो सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांचा ‘स्मार्ट सिग्नल’ प्रकल्प. सिग्नलच त्यांचे जीवन असल्याने तेथील ट्रॅफिक, वाहनांची वर्दळ, कर्कश हॉर्न आणि याबरोबरच दररोज होणारे छोटेमोठे अपघात त्यांच्यासाठी रोजचे झाले आहेत. सिग्नल शाळेच्या माध्यमातून ही मुले शिकती झालीत. मात्र, या रोज घडणाºया घटनांवर विशेषत: रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी काहीतरी तोडगा निघावा. रेल्वे वाहतुकीत जशा अनाउन्समेंट होतात किंवा फाटक बंद होते, तसे काहीतरी रस्ते वाहतुकीबाबत असावे, अशी या मुलांची कल्पना. यालाच अनुसरून प्रकल्प करण्यात आला. वाहनांना हिरवा सिग्नल मिळालेला असला, तरी अनेक पादचारी रस्ता क्रॉस करतात. हे पादचारी आणि वाहनचालकाच्या जीवावर बेतते. यावर तोडगा म्हणून या स्मार्ट सिग्नल प्रकल्पात सिग्नल पिलरच्या बाजूला एक लाइट डिपेंडेंट सेन्सॉर बसवला आहे.
एखादी व्यक्ती वाहने जात असतानाही रस्ता क्रॉस करत असेल, तर अशा वेळी हा सेन्सॉर व्यक्तीची प्रतिकृती हेरून अॅलार्म किंवा बझर देतो. यामुळे रस्ता क्रॉस करणाºया व्यक्तीलाही आपल्याला धोका असल्याचे लक्षात येईल. हा अॅलार्म त्यात्या सिग्नलवरील ध्वनिपातळी लक्षात घेऊन निश्चित करता येणार आहे. तसेच या अॅलार्मची माहिती वाहतूक नियंत्रण कक्षालाही मिळणार आहे. मुख्य म्हणजे हे यंत्र सौरऊर्जेवर चालणारे असून त्यासाठी फार खर्च होणार नाही. या सेन्सॉरमुळे अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात तरी कमी होईल, असा विश्वास या मुलांना आहे.
तंत्रज्ञानाच्या वापरासाठी रोबेटिक्स टीमचे साहाय्य मिळाले आहे. विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याचे सिग्नल शाळेच्या मुलांचे हे दुसरे वर्ष आहे.