ठाण्यात एकतर्फी प्रेमातून सुरक्षारक्षक महिलेवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:35 PM2018-11-12T22:35:58+5:302018-11-12T22:43:58+5:30
प्राची झाडे हिच्यावर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यात तिचा मृत्यु झाल्याची घटना अलिकडेच घडली होती. ही घटना ताजी असतांनाच खोपट परिसरात सोमवारी सायंकाळी विकास धनवडे या खासगी सुरक्षा रक्षकाने एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षक मंडळाच्या महिला सुरक्षा रक्षकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकतर्फी प्रेमातून सुरक्षारक्षक मंडळाच्या एका ४२ वर्र्षीय महिलेवर माथेफिरू खासगी सुरक्षारक्षक विकास धनवडे (३६, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याने चाकूने तीन ते चार वार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी त्याला ताब्यात घेतल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा येथे राहणारी ही महिला ठाणे महानगरपालिकेच्या खोपट, हंसनगर येथील सौ. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्रावर सोमवारी कर्तव्यावर होती. सायंकाळी तिथे अचानक आलेल्या धनवडे याने तिच्या मानेवर मागील बाजूला चाकूने वार केले. तिने बचावासाठी हात पुढे केल्यानंतर दोन्ही हातांवरही त्याने सपासप वार केले. आरडाओरड करून ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला तातडीने विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, मानेवर आणि श्वासनलिकेवर गंभीर घाव असल्यामुळे तिला तातडीने मुंबईच्या सर जे.जे. रुग्णालयात हलवल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. हल्ल्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनीच धनवडे याला पकडून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, ही महिला सुरक्षारक्षक महामंडळात निमसरकारी नोकरीवर असल्याने धनवडे यालाही सुरक्षारक्षक मंडळात नोकरी लावण्याचे तिने आश्वासन दिले होते. त्यापोटी त्याच्याकडून तिने टप्प्याटप्प्याने ५० ते ५५ हजार रुपये घेतले होते. हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा धनवडे याने केला आहे. तरीही, तिचे अन्य एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा संशय त्याला होता. नोकरी आणि ‘त्या’ तरुणाबरोबरच्या संबंधाचा तो सोमवारी सायंकाळी तिच्याकडे जाब विचारण्यासाठी आला होता. गेल्या चार दिवसांपासून तो तिच्याकडे याच कारणासाठी येत होता. पण, ती त्याला पूर्णपणे टाळत होती. यातूनच आलेल्या रागातून तिच्यावर हल्ला केल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी दिली. सर्व बाबींचा तपास करण्यात येत असून हल्ल्याचे नेमके कारणही पडताळण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.
प्राची झाडे पाठोपाठ तिसरी घटना...
तीन महिन्यांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर रोड भागात राहणारी प्राची झाडे हिच्यावर तीनहातनाका येथे एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला होता. यात तिचा मृत्यू झाला होता. मुंब्रा येथेही लग्नास नकार देणाऱ्या एका तरुणीवर तिच्याच नात्यातील एका तरुणाने चाकूने हल्ला केला होता. आता हा तिसरा प्रकार असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.