एकनाथ शिंदेंची चक्क आव्हाडांना 'टाळी'; भाजपाविरोधात मोर्चेबांधणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 03:24 AM2018-08-08T03:24:52+5:302018-08-08T09:28:03+5:30

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी आठवडाभरात दोन वेळा भेटीगाठी घेऊन गुफ्तगू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Shinde and Avhad among others are likely to make a strategy against Gftgao, BJP | एकनाथ शिंदेंची चक्क आव्हाडांना 'टाळी'; भाजपाविरोधात मोर्चेबांधणी?

एकनाथ शिंदेंची चक्क आव्हाडांना 'टाळी'; भाजपाविरोधात मोर्चेबांधणी?

googlenewsNext

ठाणे : ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी आठवडाभरात दोन वेळा भेटीगाठी घेऊन गुफ्तगू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाण्यात भाजपाला रोखण्याकरिता भविष्यात हे दोन्ही नेते अप्रत्यक्ष हातमिळवणी करतील, यापासून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील जुळवाजुळवीकरिताच ही भेट झाल्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत.
मागील काही महिन्यांपासून कळव्यात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी असा सामना रंगला असताना अचानक उभयतांच्या भेटींमुळे त्या संघर्षाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिंदे आणि आव्हाड यांचे संघटन कौशल्य सर्वश्रुत आहे.

‘ग्रासरूट’चे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ठाणे महापालिकेतील अनेक निर्णयांत दोघांच्या मैत्रीची झलक पाहायला मिळते. परंतु उघडपणे राजकारणात हे दोघे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चवीने केली जात आहे. आव्हाड यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता शिंदे यांनी त्यांची भेट घेतली व तब्बल तासभर चर्चा केली. त्यानंतर लागलीच नियोजन भवनातील बैठकीच्यानिमित्ताने दोघे एकत्र आले व तेथेही त्यांनी एकांतात चर्चा केल्याचे समजते. शिंदे यांच्याकडे अलीकडेच ठाणे व पालघर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. पालघर पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपाने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपाचे निरंजन डावखरे विजयी झाले.

भाजपाचे वाढते वर्चस्व ही शिंदे यांच्याबरोबर आव्हाड यांच्याकरिता डोकेदुखी ठरणार आहे. ठाणे शहर मतदारसंघ, ओवळा-माजीवडा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढताना दिसत आहे. या दोन्ही मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असताना हे मतदारसंघ भाजपाकडे सरकण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे शहरात भाजपाचा उमेदवार या नात्याने शिवा गावडे-पाटील या माथाडी नेत्याने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची बांधणी सुरु केली आहे. घोडबंदर येथील शिवसेनेच्या आमदाराची मुख्यमंत्र्यांसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. आव्हाड यांनाही कळवा-मुंब्रा मतदारसंघात घेरण्याकरिता भाजपाचे नेते प्रयत्नशील आहेत. आयात उमेदवार देऊन आव्हाड यांचे घामटे काढण्याची खेळी भाजपा खेळण्याच्या विचारात आहे. एमआयएमला रसद पुरवून आव्हाड यांची दुहेरी कोंडी करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. त्यामुळे ठाण्यातील आपल्या वर्चस्वाला फटका बसू नये म्हणून शिंदे-आव्हाड यांच्यात खलबते झाल्याचे बोलले जाते. शिवसेना सध्या सत्तेत असली तरी भाजपाचे नाक कापण्याची एकही संधी शोधत नाही. त्यामुळे ठाण्यात भाजपाला कोंडीत पकडण्याबाबतची रणनीती ठरवणे हाही या भेटीचा हेतू असू शकतो. आतापर्यंत हे दोन्ही नेते दरवर्षी धुळवडीच्या दिवशी भेटतात, हे जगजाहीर होते.

क्लस्टरच्या आंदोलनानिमित्ताने शिंदे-आव्हाड एकत्र आले होते. मात्र त्यानंतर परिवहन समिती हातची गेल्याने त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. परमार आत्महत्या प्रकरणात आव्हाडांना त्रास देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याची चर्चा होती. या प्रकरणाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसून पक्षाची ताकद कमी झाली. शिवसेनेत प्रभावशाली नेत्याची वानवा आहे. सुभाष देसाई, दिवाकर रावते हे नेते विधान परिषदेवर आहेत. शिंदे यांचा ठाणे जिल्ह्यावर वरचष्मा असून तेच शिवसेनेला निवडणुकीत रसद पुरवू शकतात हे भाजपाने हेरले आहे. त्यामुळे शिंदे यांची राजकीय पकड सैल करणे हा भाजपाचा अजेंडा आहे. याची चाहूल या दोघांना लागलेली आहे. त्यामुळे आव्हाडांचे घड्याळ ठरवेल त्या मुहूर्तावर शिंदे भाजपाच्या कमळाच्या दिशेने बाण सोडतील, अशी चर्चा आहे.

कल्याण लोकसभा निवडणुकीवर डोळा
मागील काही महिन्यांपासून कळवा भागात शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात प्रकल्पांच्या श्रेयवादावरुन वातावरण तापल्याचे दिसून आले होते. किंबहुना कळव्याचा भाग हा कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असल्याने शिवसेनेला येथील मतदार महत्त्वाचे वाटत आहेत.असे असले तरी आव्हाडांचे या मतदारसंघातील काम पाहता आणि या भागात असलेला राष्ट्रवादीचा वरचष्मा पाहता श्रीकांत यांना या भागात मतदारांची पसंती मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हेही या भेटीमागील आणखी एक कारण असू शकते, असे आता बोलले जात आहे.

Web Title: Shinde and Avhad among others are likely to make a strategy against Gftgao, BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.