उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्यकट्ट्याचा ठाण्यात दमदार शुभारंभ, पहिला नियोजित कार्यक्रम रविवारी संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 04:49 PM2018-04-09T16:49:05+5:302018-04-09T16:49:05+5:30
ठाणे: रविवारी ठाण्यात विश्रांती बंगला, डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या मागे, नौपाडा, ठाणे येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात उदवेली बुक्स आयोजित शिरीष पै काव्य कट्ट्याचे दिमाखदार उदघाटनही झाले. कवयित्री शिरीषताई पै यांचे चिरंजीव ऍडव्होकेट राजेंद्र पै हे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास लाभले होते.
कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, बालवाङ्मय, स्फुट लेखन, संपादन साहित्याच्या अशा विविध प्रकारामध्ये मुशाफिरी करीत असताना शिरीषताई 'हायकू' सारख्या अतिशय तरल अशा काव्यप्रकारामध्ये मनोमन रमल्या, बहरल्या. हायकू म्हणजे विचार नव्हे, चिंतनही नव्हे तर जिवनाबद्दलची ती सहज प्रतिक्रिया आहे असे अगदी सहजपणे शिरीष ताई आपल्याला हायकू बदल सांगून जातात. अशा चतुरस्त्र, उत्तुंग प्रतिभेच्या कवयित्रींच्या नावाने सहा महिन्यापूर्वी शिवाजीपार्क, दादर येथे शिरीष पै काव्य कट्टा सुरु करण्यात आला. अगदी त्याच धर्तीवर, उगवत्या आणि नवे काही करू पाहणाऱ्या आजच्या कवी मंडळींसाठी आपल्या ठाण्यात एक स्वतंत्र मुक्तपीठ सुरु करण्याचा विचार डॉ. सुधीर मोंडकर आणि विवेक मेहेत्रे यांनी राजेंद्र पै यांच्याकडे मांडला आणि त्यास रितसर मान्यता मिळाल्यावर हा कट्टा सुरु झाला. ठाणे, मुंबई, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथून कविमंडळी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. जवळजवळ ४५ कविमित्रांनी आपल्या कविता काव्यकट्ट्यावर पेश केल्या, त्याला रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री जोशी यांनी केले तर कविकट्ट्याचे सूत्रसंचालन कवी रामदास खरे यांनी केले. कार्यक्रमाला अनेक नवी-जुनी कविमंडळी, मान्यवर उपस्थित होते. कवयित्री मेघना साने,ज्योती गोसावी, भारती मेहता, तसेच कवी सतीश सोळांकूरकर, विवेक मेहेत्रे, कॅप्टन वैभव दळवी, गीतेश शिंदे, आदित्य दवणे, विकास भावे, अनंत जोशी, विलास पडवळ, मनमोहन रोगे, रवींद्र कारेकर, आदि कविमंडळींनी आपल्या कविता सादर केल्या. राजेंद्र पै यांनी आपल्या आईंच्या आठवणी जागृत केल्या, तसेच आईवरील एक कविताही पेश केली. तेव्हा वातावरण अवघे भारावून गेले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, बहरत गेला. जगताप यांनी सर्वांचे आभार मानले. ठाण्यातील शिरीष पै कट्ट्याचे आयोजन हे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी उदवेली बुक्स प्रकाशनातर्फे केले जाणार आहे. पुढील काव्यकट्याची तारीख ही १३ मे २०१८ अशी असणार आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले.