नाटक पाहणे महागण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:34 AM2017-08-14T03:34:41+5:302017-08-14T03:34:43+5:30

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर या दोन्ही नाट्यगृहांच्या भाडेदरवाढीचा प्रस्ताव बुधवारी होणाºया केडीएमसीच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला

Signs of Expensive Signs of Drama | नाटक पाहणे महागण्याची चिन्हे

नाटक पाहणे महागण्याची चिन्हे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च पाहता कल्याणचे आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर या दोन्ही नाट्यगृहांच्या भाडेदरवाढीचा प्रस्ताव बुधवारी होणाºया केडीएमसीच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास व्यावसायिक नाट्यसंस्थांसह सामाजिक, शैक्षणिक संस्थांना जादा दर मोजावे लागणार आहे.
दोन्ही नाट्यगृहांतील विविध कार्यक्रमांबाबतचे दर ठरविण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार केला होता. त्यावर निर्णय घेण्यासाठी २० जून २०१६ ला झालेल्या महासभेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने वेळोवेळी बैठका घेऊन नव्या भाडेदरवाढीचा अहवाल तयार केला आहे. तो प्रस्ताव बुधवारच्या महासभेत अंतिम मंजुरीसाठी ठेवला आहे.
नाट्यगृह सुरू झाल्यापासून कोणतीही भाडेवाढ झालेली नसल्याकडे लक्ष वेधत देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च पाहता भाडेवाढ ही अपरिहार्य असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले होते. परंतु, या समितीने प्रशासनाने सुचविलेल्या दरातील बदलानुसार नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाने सादर केला आहे. मागील वेळेस ज्यावेळी दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यावेळी मुंबई नाट्य निर्माता संघाने नाराजी व्यक्त करत भाडेवाढ झाल्यास नाट्यगृहात एकही प्रयोग करणार नाही, असा इशारा दिला होता. या धर्तीवर बुधवारच्या महासभेत कोणता निर्णय घेतला जातो? याकडे लक्ष लागले आहे.
समितीचे नवे दर
सरकारमान्य शाळा आणि विनाअनुदानित शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सध्या अनुक्रमे ७ हजार रुपये आकारले जातात. त्यात वाढ करून प्रशासनाने १५ हजार रूपये केले होते. त्यावर समितीने १० हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तर खाजगी शाळांसाठी हे भाडे १२ हजार रुपये ठरवण्यात आले आहेत. प्ले ग्रुप, नर्सरी, अंगणवाडी यांच्या कार्यक्रमांसाठी सध्या १४ हजार घेतले जातात, प्रशासनाने त्यात १ हजाराची वाढ केली होती. परंतु, समितीने जुना दर कायम ठेवला आहे. तर अशा हद्दीबाहेरील संस्थांसाठी २० हजार रुपये भाडे आकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, समितीने जून्या १८ हजारांच्या दरात कपात करून तो १५ हजारांवर आणला आहे. सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे यांच्याकडून १८ हजार भाडे आकारण्यात येणार आहे. निधी संकलन कार्यक्रम करणाºया सामाजिक, शैक्षणिक संस्थेचे सध्या भाडे १५ हजार आहे. प्रशासनाने यात ५ हजारांची वाढ केली होती. परंतु, नवीन दरानुसार १८ हजार आकारण्यात येणार आहेत. व्यावसायिक बालनाट्यासाठी ३ हजार ५०० ऐवजी ४ हजार रुपये ठरवण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील हौशी बालनाट्यासाठी २५०० रुपये भाडे मोजावे लागणार आहे. तर नृत्य, गायन, वादन स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारच्या संस्थांसाठी १५ हजार ठरविण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी कोणतेही भाडे आकारण्यात आलेले नाही. नाट्यगृहाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रायोगिक नाट्यसंस्था, नाट्य परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमांसाठी ३ हजार, रंगीत तालिमीसाठी १५०० रुपये, केडीएमसीच्या कर्मचाºयाच्या पदोन्नती, निवृत्ती कार्यक्रमासाठी मेन हॉल ४ हजार रुपये, कॉन्फरन्स हॉलमधील साखरपुडा, वाढदिवस या कार्यक्रमासाठी ५ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
>व्यावसायिक नाट्यसंस्थांसाठी असे असतील दर
सोमवार ते शुक्रवार, सकाळ दुपार व रात्र यात तिकीट दर १०० रुपयांपर्यंत- भाडे ४ हजार ५०० रुपये, तिकीट दर १०१ ते १५०- भाडे ५ हजार ५०० रुपये, तिकीट दर १५१ ते २५० -भाडे ७ हजार ५०० रुपये, तिकीट दर २५१ ते ३०० रुपये - भाडे १० हजार ५०० रुपये, तिकीट दर ३०० च्या पुढे असेल तर भाडे ११ हजार ५०० रुपये आकारले जाणार आहेत. शनिवार आणि रविवार, सार्वजनिक सुट्टी तसेच सुट्टीची आदली रात्र यावेळी जादा दर आकारण्यात येणार आहेत. यात तिकीटदराप्रमाणे अनुक्रमे ५ हजार ५००, ६ हजार ५००, ८ हजार ५००, ११ हजार आणि १२ हजार रूपये असे हे दर असणार आहेत. विशेष बाब म्हणजे पुढील ३ आर्थिक वर्षांसाठी प्रत्येक वर्षी ५ टक्के याप्रमाणे दरवाढ करण्यात यावी, अशी सूचनाही समितीने केली आहे.

Web Title: Signs of Expensive Signs of Drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.