राष्ट्रवादीला आणखी भगदाड पडण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:29 AM2018-05-24T02:29:12+5:302018-05-24T02:29:12+5:30

आव्हाडांना घेरण्याचे डावपेच : पक्षातील काही नेते उघडपणे शिवसेना-भाजपाच्या संपर्कात

Signs of national breakdown in NCP | राष्ट्रवादीला आणखी भगदाड पडण्याची चिन्हे

राष्ट्रवादीला आणखी भगदाड पडण्याची चिन्हे

Next


ठाणे : पक्षाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत आमदार निरंजन डावखरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ठाण्यात राष्ट्रवादीला धक्का बसलेला असतानाच आणखी काही नगरसेवक, पदाधिकारीही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. त्यातून मुंब्रा-कळवा मतदारसंघातील आव्हाड यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा शिवसेना, भाजपाचा प्रयत्न आहे. यात परमार प्रकरणात अडकलेल्या काही नगरसेवकांचा आणि सध्या आव्हाड यांच्या खांद्याला खांदा लावून नेतृत्त्व करणाऱ्या काही नेत्यांचाही समावेश असल्याची माहिती राष्टवादीतील सूत्रांनी दिली.
कोकण पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून भाजपामध्ये जाताना डावखरे यांनी आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या राजकारणावर टीका केली. आव्हाड यांच्यावर झालेली टीका आजची नाही. यापूर्वीही आव्हाडांच्या कार्यशैलीला कंटाळलेल्या अनेकांनी एकतर पक्ष सोडला किंवा नेता बदलल्याचे दिसून आले. ठाण्यात राष्ट्रवादी एकसंध असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक अशा तीन गटांत पक्ष विभागलेला होता. वसंत डावखरे यांच्या निधनाआधीच त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निधनानंतर पक्षातील त्यांचा गट जवळजवळ संपुष्टात आला, तर गणेश नाईक यांचा स्वत:चाच आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांचा ठाणे शहरातील दबदबाही कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतरही पालिका निवडणुकीत पक्षाचे ३४ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा प्रभाव वाढला. पण त्याचेच रूपांतर एकखांबी नेतृत्त्वात झाल्याचे बोलले जाऊ लागले. पण आव्हाड यांनी कळवा-मुंब्रावगळता ठाण्याकडे फारसे लक्षच दिले नसल्याची टीकाही त्यांच्यावर झाली. केवळ आपल्या गटातील, आपल्या मर्जीतील मंडळींना मोठे करण्याचा अट्टहास सुरू झाल्याने अंतर्गत खदखद बाहेर पडू लागली. पक्षातील उमेदवाराविरोधात प्रचार करणे, आपल्या गटातील उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी प्रयत्न करणे, गटबाजी करणे या मार्गाने ती बाहेर पडू लागली.
निरंजन डावखरे यांच्या जाण्याने ठाण्यातील राष्ट्रवादीवर काही परिणाम होणार नसल्याचा दावा जरी केला जात असला, तरी येत्या काळात राष्ट्रवादीला आणखी मोठे धक्के बसतील, हे यातून समोर आले. काहींनी इतर पक्षात जाण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कळव्यातील राष्ट्रवादीचे एक दिग्गज दाम्पत्यही शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांचे पुत्र तर आव्हाडांविरोधात शिवसेनेतून आमदारकीसाठी लढण्याच्या तयारीला लागले आहेत. दुसरीकडे आव्हाडांच्या गटातील मानला जाणारा आणि राबोडी पट्ट्यातील एक बडा नगरसेवकही शिवसेनेच्या संपर्कात आल्याचे बोलले जाते. त्याने तर मुब्रा-कळव्यात आव्हाडांविरोधात शिवसेनापुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याची तयारी दर्शवल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. हाही आव्हाडांना मोठा धक्का मानला जातो. लोकमान्यनगर पट्ट्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवकही भाजपाच्या संपर्कात असून त्यांनी ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातून आमदारकीचे तिकीट मागितल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले. हा नगरसेवक भाजपात आला, तर त्याच्या सोबत असलेले आणखी तीन नगरसेवकही पक्षात येतील आणि भाजपाची ताकद वाढली, तर पालिकेतील राजकीय समीकरणेही बदलतील.

निरंजन डावखरे हे तर आक्रमक नेतत्व : आव्हाड यांची तिरकस प्रतिक्रिया
निरंजन डावखरे हे अत्यंत निष्ठावंत, प्रामाणिक आणि ‘आक्रमक’ युवा नेतृत्व होते. त्यांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रचंड नुकसान झाले आहे, अशा तिरकस शैलीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पक्ष सोडण्यावर टीका केली आहे. निरंजन डावखरे यांच्या आक्र मकतेला पक्ष मुकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहे. या काळात निरंजन यांच्या आक्र मकतेमुळे सत्ताधारी ‘भयकंपित’ झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांची कुवत, आक्र मकता, अभ्यासपूर्ण राजकीय प्रगल्भता, त्यांची क्षमता महाराष्ट्राने पाहिली. त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना प्रचंड दु:ख झाले, असे आव्हाडांनी म्हटले आहे. आपले वडील वसंत डावखरे यांना राष्ट्रवादीने दिलेला सन्मान, आमदारकीच्या २४ वर्षांपैकी १८ वर्षे दिलेले उपसभापतीपद, त्यातून मिळालेले फायदे, स्वत: निरंजन यांना राष्ट्रवादीने दिलेली आमदारकी, राज्य पातळीवर युवक अध्यक्ष म्हणून नेतृत्त्व करण्याची दिलेली संधी, सन्मान आणि प्रतिष्ठा, पवार कुटुंबीयांचा जिव्हाळा याचे स्मरण तरी निरंजन यांना पक्ष सोडताना व्हायला हवे होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: Signs of national breakdown in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.