स्मार्ट सिटीचे प्रकल्प कागदावरच, कसे होणार ठाणे स्मार्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 01:56 AM2019-06-27T01:56:59+5:302019-06-27T01:57:06+5:30
शाश्वत विकास प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देऊन ठाणे स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने आणि डीजी ठाणे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अनेकविध उपक्र म राबवण्यात आले आहेत.
ठाणे - शाश्वत विकास प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देऊन ठाणेस्मार्ट सिटीच्या पुढाकाराने आणि डीजी ठाणे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अनेकविध उपक्र म राबवण्यात आले आहेत. इस्रायलच्या धर्तीवर राबवलेल्या डीजी ठाणे उपक्र मांतर्गत १.४ लाख नागरिकांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या ठाणे स्मार्ट सिटीच्या बैठकीत देण्यात आली.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सर्व संचालक मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन स्टेशन, तीनहातनाका वाहतूक सुधारणा प्रकल्प, पार्किंग व्यवस्थापन, समूह विकास योजना, खाडीकिनारा विकास प्रकल्प, एलईडी दिवे प्रकल्प, तलाव सुशोभीकरण व संवर्धन प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प, घनकचरा प्रक्रि या केंद्राचे विकेंद्रीकरण, स्मार्ट मीटर, सीसीटीव्ही व वायफाय प्रकल्प असे स्मार्ट सिटी मिशन, राज्य सरकार आणि महापालिका निधीमधून जवळपास ५४०० कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी यातील बहुतेक प्रकल्प भूमिपूजनाचा घाट वगळता कागदावरच आहेत. यामुळे या सर्व प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
या उपक्र मांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते गृहनिर्माण सहकारी सोसायटीपर्यंत समाजातील सर्व घटकांना शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करून पायाभूत विकासाबरोबरच आनंदी शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, यासाठी ठाणे स्मार्ट सिटीच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून गेल्या वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये नवरात्र, गणेशोत्सव, दिवाळी या उत्सवांमधून नागरिकांसाठी विविध स्पर्धा, आरोग्य शिबिर, योगा प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्मार्ट सिटीने आपला सहभाग नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे.
तरुणांसह लहानांचाही सहभाग
तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी डीजी ठाणे युथ आयकॉन स्पर्धा, व्हॅलेंटाइन डे च्या माध्यमातून सामाजिक आणि नागरी उपक्र म राबवून तरुणांना शाश्वत विकासाच्या प्रक्रि येमध्ये सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने पल्स पोलिओ, मिझेल रूबेला लसीकरण आदी उपक्र मांमध्ये लक्षणीय कामगिरी बजावली आहे.
लहान मुलांच्या माध्यमातून विकासाची संकल्पना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी स्मार्ट किड्स स्पर्धा, महिला दिनाचे कार्यक्रम, स्वच्छता मोहिमेंतर्गत थुंकू नका मोहीम, निवडणूक, मालमत्ताकर मोहीम, रॅम्प स्पर्धा, नृत्य स्पर्धा असे उपक्र म राबवून नागरिकांना या प्रक्रि येमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न डीजी ठाणेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.