गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:46 AM2017-08-09T06:46:52+5:302017-08-09T06:46:52+5:30

कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असून यासाठी बाहेरगावी गेलेले लोक गणेशोत्सवासाठी आपल्या गावात दाखल होतात. तेव्हा या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे आणि एसटी सज्ज असतात.

ST ready for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज

Next

जयंत धुळप  
अलिबाग : कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असून यासाठी बाहेरगावी गेलेले लोक गणेशोत्सवासाठी आपल्या गावात दाखल होतात. तेव्हा या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे आणि एसटी सज्ज असतात. यंदाच्या गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि उपनगरांतून किमान दीड लाख गणेशभक्त येत्या रविवार, २० आॅगस्टपासून कोकणातील आपापल्या गावी येणार आहेत. यासाठी तब्बल २ हजार २१६ एसटी बसेसमधून रवाना होणार आहेत. या सर्व गणेशभक्तांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोच करण्याची सेवा देण्याकरिता मुंबई एसटी विभागातील २५० एसटी बसेस बरोबरच पुणे, औरंगाबाद आणि नाशिक विभागातील प्रत्येकी ५०० याप्रमाणे एकूण १ हजार ७५० एसटी बसेस चालक आणि वाहकांसह सज्ज होत आहेत.
मुंबई विभागातील अनेक चालक-वाहकांच्या घरी देखील गणेशाचे आगमन होत असल्याने, त्यांनाही सुट्टी देणे गरजेचे असते.अशा वेळी कमी पडणारी चालक-वाहकांची संख्या भरुन काढून कोकणातील गणेशभक्तांना विनाखंड प्रवासी सेवा देण्याकरिता औरंगाबाद विभागातून ८० चालक व ४० वाहक, नागपूर विभागातून ८५ चालक व ४५ वाहक तर अमरावती विभागातून ८५ चालक व ४० वाहक असे एकूण २५० चालक व १२५ वाहक मुंबईत दाखल होत आहेत. आगाऊ आरक्षित व ग्रुप बुकिंगच्या एकूण २ हजार २१६ एसटी बसेस येत्या २० आॅगस्टपासून सुरु होवून कोकणात एकूण सुमारे १ लाख १० हजार ८०० गणेशभक्त रवाना होणार आहेत. यातील १ हजार १२२ बसेस मुंबईतून, ८७३ बसेस ठाण्यातून तर २२१ बसेस पालघरमधून कोकणातील विविध गावांत जाणार आहेत.
रविवारी २० आॅगस्ट रोजी कोकणात गणेशभक्तांना घेवून जाणाºया एसटी बसेसचा प्रवास सुरू होणार असून या पहिल्या दिवशी १३ बसेस रवाना होतील. सोमवार २१ आॅगस्ट रोजी ७१, मंगळवार २२ आॅगस्ट ३५३, बुधवार२३ आॅगस्ट रोजी सर्वाधिक म्हणजे १ हजार ५७५ बसेस तर गुरुवार २४ आॅगस्ट रोजी २०४ बसेस कोकाणात रवाना होत आहेत.

भक्तीस्नेहाची परंपरा
१आपल्या नोकरीच्या चौकटी पलीकडे जावून निभावलेले भक्तीस्नेहाचे नाते एसटी चालक आणि कर्मचाºयांचे आहे.
२पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी-कार्तिकी वारी वा नाशिकचा कुंभमेळा त्यावेळी कोकणातला एसटी चालक-वाहक आपल्या एसटी बसेस घेवून नाशिक-पंढरपुरातल्या भक्तगणांच्या प्रवासी सेवेकरिता दाखल होतात.
३तर कोकणचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या गणेशोत्सवाकरिता या चाकरमान्यांना त्यांच्या थेट गावी पोहोच करण्याकरिता विदर्भ-मराठवाड्यातील एसटी चालक आणि वाहक आपापल्या एसटी बसेस घेवून दाखल होतात.
४गेल्या अनेक वर्षांपासूनची ही अनोख्या भक्तीस्नेहाची परंपरा आजही अबाधित आहे.

ंचार ठिकाणी विशेष दुरुस्ती पथके

रायगड विभागातून जाणाºया गणेशभक्तांच्या सेवेकरिता रामवाडी (पेण) येथील रायगड विभाग देखील सज्ज झाला असल्याची माहिती रायगड एसटी विभागाचे वाहतूक अधिकारी संजय हर्डीकर यांनी दिली आहे.

गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था असली तर एसटी बसमधून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाºया प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास वा असुधिवा होवू नये याकरिता एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे.
प्रवासादरम्यान एसटी बस नादुरुस्त झाल्यास ‘रामवाडी(पेण) ते पोलादपूर’ या टप्प्यातील दुरुस्तीची जबाबदारी ठाणे विभागाकडे देण्यात आली असून त्यांच्याच माध्यमातून इंदापूर येथे दुरुस्ती पथक तैनात करण्यात येत आहे.
पोलादपूर येथे दुरुस्ती पथक तैनात करून ‘पोलादपूर ते चिपळूण’ टप्प्याची जबाबदारी रायगड विभागाकडे सोपविण्यात आली आहे. संगमेश्वर येथे दुरुस्ती पथक तैनात करून ‘चिपळूण ते राजापूर’ टप्प्याची जबाबदारी रत्नागिरी विभागाकडे देण्यात आली आहे. तर तरळा येथे दुरुस्ती पथक तैनात करून ‘राजापूर ते सावंतवाडी’ या टप्प्याची जबाबदारी सिंधुदुर्ग विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

Web Title: ST ready for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.