ठाण्यात स्थायी समितीचे अडले घोडे, सध्या आयुक्तांच्या बजेटनुसार कामे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:46 AM2019-05-29T00:46:11+5:302019-05-29T00:46:18+5:30
सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे.
ठाणे : सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे. त्यामुळे आता यापुढील प्रस्ताव थेट महासभेतच मंजुरीसाठी जाणार आहेत. परंतु, त्या आधीच महत्त्वाची कामे खोळंबू नयेत म्हणून आयुक्तांच्याच बजेटमधून काही कामे केली जात असल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीची गणिते जुळविण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसची मदत घेतली होती. परंतु, ही मदत चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा आरोप काँग्रेसच्या इतर नगरसेवकांनी केला होता. यविरोधात विरोधक न्यायालयात गेले होते. त्यानंतर आता पक्षीय बलाबलानुसार सदस्यांची निवड व्हावी असे स्पष्ट करण्यात आले होते. असे असतांनाही शिवसेनेने पुन्हा काँग्रेसलाच हाताशी धरून पुन्हा चुकीच्या पद्धतीने निवड केली. त्यामुळे आता स्थायी समितीचे पुन्हा भिजत घोंगडे राहणार असल्याचे दिसत आहे. त्यात आता केवळ आर्थिक गणिते जुळावीत आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निधी मिळावा म्हणूनच ही सत्ताधाऱ्यांना समिती गठीत करायची नसल्याचा आरोप राष्टÑवादीने केला होता. त्यामुळे स्थायीचे प्रस्ताव महासभेत नेऊन मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
एकूणच सत्ताधारी आणि विरोधकांमुळे स्थायीचे गणित पुन्हा कोलमडले आहे. त्यामुळे स्थायी समिती गठीत होत नाही, तो पर्यंत विकास कामे खोळंबू नयेत म्हणून आता पालिकेने आयुक्तांच्या बजेटनुसार कामे करण्यास सुरुवात केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यानुसार रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, नालेसफाई अशी अत्यावश्यक कामे याच बजेटमधून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे लोकप्रतिनिधी किंवा सत्ताधारी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.