मुंब्रा, रबाले भागातील दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:44 PM2017-12-15T22:44:39+5:302017-12-15T22:53:21+5:30
दिवा, दातिवलीपाठोपाठ अवघ्या २४ तासांमध्ये खर्डी ते आगासन दरम्यानच्या खाडी किनारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारुच्या रसायनासह तीन लाखांचा ऐवज जप्त केला.
ठाणे : मुंंब्रा, डायघर आणि रबाले भागातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने शुक्रवारी दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत दारु निर्मितीसाठी लागणा-या रसायनासह तीन लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील आणि पी. पी. घुले आदींच्या पथकाने शुक्रवारी (१५ डिसेंबर रोजी ) खर्डी ते आगासन दरम्यान खाडी किनारी भागात गावठी हातभट्टीवरील दारु निर्मितीच्या तीन अड्डयांवर कारवाई केली. यामध्ये रसायनाने भरलेले २०० लीटर क्षमतेचे ६२ प्लास्टीकचे ड्रम, २०० लीटर क्षमतेचे रिकामे ४८ तसेच १२ हजार ८०० लीटर रसायन असा तीन लाख ८०० रुपयांचा ऐवज जप्त करुन नाश केल्याची माहिती अधीक्षक नाना पाटील यांनी दिली.
याशिवाय, नवी मुंबईच्या रबाले परिसरातही बोज्जावार यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये गावठी दारुची विक्री करणा-या रामदास धांडे, राजू शाह आणि साहेबराव तायडे या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २० लीटर गावठी दारुसह सहा हजार ३६८ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...................................
२४ तासांमध्ये दुसरी कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिवा, दातिवली परिसरातील गावठी दारुच्या अड्डयांवर गुरुवारी सकाळी धाडसत्र राबविले. या धाडीत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १९८० लीटर गावठी दारुसह इतर सामुग्री असा एक लाख सात हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला. या घटनेला २४ तास उलटण्याच्या आतच शुक्रवारी खर्डी ते आगासन दरमयानच्या खाडी किनारी भागातील दारु अड्डयांवर या विभागाने ही कारवाई केल्याने अवैध दारु अड्डेचालकांचे चांगलेच दाबे दणाणले आहेत.