राज्य आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा दौरा; विवेक पंडितांनी घेतली आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 07:34 AM2019-06-22T07:34:13+5:302019-06-22T07:34:22+5:30
राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांचा शासकीय दौरा सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू आहे, नुकताच पालघर,अमरावती आणि नाशिक जिल्ह्याचे दौरे नुकतेच पार पडले, यातही पंडित यांनी अनेक ठिकाणी भेटी देत, पाहणी केली
शहापूर - राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित (राज्यमंत्री) यांचा ठाणे जिल्हा दौरा सुरू झाला आहे. शहापूर तालुक्यातुन सुरू झालेल्या या झंझावाती दौऱ्यात पंडित यांनी सर्वप्रथम शहापूर उपजिल्हा रुग्णालयात भेट देत आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली. यानंतर शासकीय तंत्र निकेतन, तालुक्यातील बालविकास प्रकल्प ,अंगणवाडी यांना भेटी देत दौरा सुरू राहिला.
राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांचा शासकीय दौरा सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू आहे, नुकताच पालघर,अमरावती आणि नाशिक जिल्ह्याचे दौरे नुकतेच पार पडले, यातही पंडित यांनी अनेक ठिकाणी भेटी देत, पाहणी केली. ठाणे जिल्हा दौऱ्यात अधिकारी आणि प्रशासनाच्या अडचणीही समजून घेण्याचा प्रयत्न पंडित यांनी केला.
यावेळी काही नागरिकांनी,सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी समस्या तक्रारींची निवेदने यावेळी राज्यमंत्री विवेक पंडित यांना दिली. यावेळी आलेल्या तक्रारीबाबत पंडित यांनी तातडीने अधिकाऱ्यांना विचारणा केली. यावेळी काही शिक्षक ,कर्मचारी राजकीय दबाव आणून आपल्या सोयीप्रमाणे प्रतिनियुक्त्या करून घेतात. काम एकीकडे आणि वेतन दुसरीकडे अशी अवस्था असते. याबाबत नागरिकांमध्ये,पालकांमध्ये संताप होता. पंडित यांनी येथील प्रकल्प अधिकारी ए.के.जाधव यांना याबाबत सूचना देत सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करण्याबाबत आदेश केले. याबाबत कोणत्याही राजकीय दबावाचा विचार करण्याची आवश्यकता नाही असे यावेळी पंडित यांनी सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयात पंडित यांनी तब्बल दोन तास वेळ दिला. पूर्ण रुग्णालयाची पाहणी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत पंडित यांनी तपशीलवार आढावा घेतला. येथील धोरणात्मक त्रुटी आणि रुग्णालयातील प्रशासकीय त्रुटी याबाबत तपशीलवार नोंदी घेत आढावा घेण्यात आला, येथील कंत्राटी सफाई कामगारांच्या वेतन आणि इतर सुविधांबाबत माहिती घेत त्यांना तातडीने थकीत वेतन अदा करण्याचे आदेश देत पंडित यांनी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले.
वीरबाला हाली बरफच्या नवीन घराला विवेक पंडितांची भेट
हाली बरफ या वाघाशी झुंज दिलेल्या आदिवासी विरबालेच्या घरी अध्यक्ष विवेक पंडित यांनी दौऱ्या दरम्यान भेट दिली. हाली बरफच्या धाडसाचे कौतुक करत 2013 साली सरकारने सन्मान करत तिला वीरबाला पुरस्कार मिळाला. मात्र त्यानंतर हाली आणि तिचे कुटुंब पूर्णपणे दुर्लक्षित झाले. पाठ्यक्रमात हालीच्या जीवनावर “वीरबाला हाली”हा धडा आल्यानंतर माध्यमांनी हालीबाबत बातमी केली आणि नंतर विवेक पंडित यांच्या सुचनेने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करत हलीला घर आणि रोजगार मिळवून दिले.