ठाण्यात मद्याच्या नशेत मित्रावर कोयत्याने हल्ला करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 06:01 PM2017-12-06T18:01:54+5:302017-12-06T18:05:40+5:30
नशेत झोपण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्रावर हल्ला केला होता. त्यानंतर फरार झालेल्यात्या हल्लेखोरास पोलिसांनी अखेर जेरबंद केले.
ठाणे : येथील रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपण्यावरून झालेल्या वादातून कोयत्याने हल्ला करणा-या सलमान खान (२२) या हल्लेखोरास ठाणे लोहमार्ग पोलिसांनी कुर्ल्यातून अटक केली. तसेच त्याच्याकडून हल्ल्यासाठी वापरलेला कोयता हस्तगत केला. तसेच त्याने गुन्ह्याची क बुली दिल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
हल्लेखोर सलमान आणि जखमी बंडू सोनावणे हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावर वास्तव्यास होते. शनिवारी एका हॉटेलमध्ये दोघांनी एकत्रच जेवण आणि मद्यपान केले. त्याचे बिल सलमान याने अदा केले होते. दरम्यान, रात्रीच्या वेळेस स्थानकात झोपण्यास बंडू याने सलमानला विरोध केला होता. त्या वेळी दारूच्या नशेत असलेला सलमान याने रागाच्या भरात कोयत्याने बंडूवर हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार केल्यानंतर तो तेथून फरार झाला होता. त्याने थेट मुंबई गाठली होती. जखमी बंडूला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्याची प्रकृती सुधारत आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात दोघांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केले, तेथील सीसीटीव्ही कॅमे-यात ते दोघे जेवण करताना दिसले. त्यावरून सलमानची ओळख पुढे आली होती. याचदरम्यान, हल्लेखोर सलमान हा कुर्ला रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, मंगळवारी रात्री कुर्ला स्थानकात सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून हल्ल्यासाठी वापरलेला कोयता हस्तगत केला आहे. तसेच त्याने आपल्या गुन्ह्याची क बुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी दिली. त्याला बुधवारी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अविनाश औंधकर करत आहेत.