महासभेत गाजणार शहरातील अधिकृत, अनाधिकृत जीवघेण्या होर्डींग्जचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 03:16 PM2018-10-19T15:16:25+5:302018-10-19T15:18:50+5:30
ठाणे शहरातील होर्डींग्ज आणि त्यावर प्रसिध्द होणाऱ्या जाहीरातींचा विषय शनिवारच्या महासभेत गाजणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रशासनाला घेरण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे - पुण्यात होर्डींग्ज पडून झालेल्या दुर्देवी घटनेत चार जणांचे प्राण गेले असून १० जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील अधिकृत, अनाधिकृत आणि जीवघेण्या होर्डींग्जचा विषय शनिवारी होणाऱ्या महासभेत चांगलाच गाजणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केले असून त्याची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी ठाणे शहरात बेकायदा होर्डींग्ज वरुन महापालिकेला न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर काही बेकायदा होर्डींग्जवर कारवाई करण्यात आली. परंतु त्यानंतर आज तर ठाणे शहर हे संर्पूणपणे होर्डींग्जच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. दरम्यान आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पूण्यात होर्डींग्ज पडून झालेल्या घटनेनंतर राज्यातील सर्वच महापालिका क्षेत्रातील होर्डींग्जचा विषय चर्चेला आला आहे. ठाण्यात तर होर्डींग्जची संख्या दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. शहरात एकूण ४५० होर्डिंगला ठाणे महापालिकेने परवानगी देण्यात आली असून यातील काही होर्डिंग तर २५ ते ३० वर्ष जुनी असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. परंतु अनाधिकृत होर्डींग्जची संख्या मात्र आजही गुलदस्त्यात आहे. त्यात आता २५ ते ३० वर्षे जुन्या असलेल्या होर्डींग्जच्या बाबत स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार तशा आशयाच्या नोटीसासुध्दा बजावण्यात आल्या आहेत. परंतु, त्याचे पुढे काय झाले याची माहिती होणे अपेक्षित आहे. महापालिका क्षेत्रात तर महापालिकेने घालून दिलेल्या १८ प्रकारच्या नियमावलीला या होर्डींग्जवाल्यांनी कात्रजचा घाट केव्हांच दाखविला आहे. शहरात कुठेही कसेही, कशाही पध्दतीने सºसारपणे होर्डींग्जचे जाळे पसरले आहे. इमारत अधिकृत असो अथवा अनाधिकृत या इमारतींवरसुध्दा होर्डींग्जचे जाळे पसरले आहे. आनंद नगर ते ओवळा या पाच ते सात किमीच्या अंतरावर नजर फिरेल त्या ठिकाणी होर्डींग्ज दिसून येत आहेत. माजिवडा ते मानपाडा अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर तब्बल २०० होर्डींग्जचे जाळे उभे आहे. त्यातील सुमारे ७२ होर्डींग्जलाच परवानगी असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. कळवा खाडीत तर कांदळवनाची कत्तल करुन त्याठिकाणी बेकायदा होर्डींग्ज उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. नियमानुसार २० फुटापर्यंत होर्डींग्ज उभारण्याची परवानगी असतांना खाडीत तब्बल १०४ फुटांचे होर्डींग्ज उभे राहण्याच्या तयारीत आहे. परंतु पालिकेने त्यावर कारवाई करण्याचे धाडस अजूनही दाखविलेले नाही. एकूणच या सर्व मुद्यांवरुन शनिवारच्या महासभेत सर्व पक्षीय नगरसेवक प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पालिकेला जाब विचारणार आहेत.