सुनील चव्हाण ठाण्याचे ‘स्मार्ट’ सीईओ; आयुक्तांपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:25 AM2017-11-01T05:25:03+5:302017-11-01T05:25:13+5:30
महापालिका आयुक्तांना २५ लाखापर्यंतच खर्चाची कामे करण्याचे अधिकार महाराष्टÑ महापालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलम ७३ (क) अन्वये देण्यात आले आहेत. परंतु, आयुक्तांपेक्षा स्मार्ट सिटी लिमिटेडच्या सीईओंना मात्र तब्बल एक कोटी रुपयांपर्यंच्या खर्चाची कामे करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
ठाणे : महापालिका आयुक्तांना २५ लाखापर्यंतच खर्चाची कामे करण्याचे अधिकार महाराष्टÑ महापालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलम ७३ (क) अन्वये देण्यात आले आहेत. परंतु, आयुक्तांपेक्षा स्मार्ट सिटी लिमिटेडच्या सीईओंना मात्र तब्बल एक कोटी रुपयांपर्यंच्या खर्चाची कामे करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेत आता आयुक्तांपेक्षा स्मार्ट सिटीचे सीईओ सुनील चव्हाण हेच अधिक ‘स्मार्ट’ ठरणार आहेत.
टीएससीएलच्या संचालक मंडळाची एक बैठक नुकतीच कंपनीचे अध्यक्ष आणि प्रधान सचिव (महसूल) मनुकुमार श्रीवास्तव यांच्या कार्यालयात झाली. टीएससीएलचे सीईओ तथा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी या बैठकीत २९ विविध प्रस्ताव मंजुरीसाठी मांडले होते. त्यात कल्याण डोंबिवली आणि सोलापूर पालिकेतील स्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओंना एक कोटी रुपयांपर्यंतचा खर्च स्वत:च्या अधिकारात करण्याची परवानगी देण्यात आली असून त्या धर्तीवर ठाण्यातही असे अधिकार मिळावेत, असा प्रस्ताव होता. त्याला या सभेत मंजुरी मिळाली आहे. दरम्यान या कंपनीची स्थापना झाल्यानंतर त्यावर पालिकेच्या महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि स्थायी समिती सदस्यांना संचालकपद देण्यात आले.
या सभेचा अजेंडाच तब्बल चार वेळा बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही तो इंग्रजीत असल्याने त्याचा अभ्यास करण्यासही पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. श्रीवास्तव यांच्यासमवेतची संपूर्ण बैठक मराठीत झाली. मग, अजेंडा इंग्रजीत देण्याचा अट्टाहास का, असा सवाल उपस्थित झाला. पुढील बैठकीपासून अजेंडा मराठीत सादर करण्याचे आदेश दिले.