ठाणे: आठ लाखाच्या रोकड लुटीतील फिर्यादीच निघाला आरोपी; कर्ज फेडण्यासाठी ठेकेदाराने केला लुटीचा बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 04:17 PM2018-02-21T16:17:12+5:302018-02-21T16:22:30+5:30
घोडबंदर रोडवर गायमुखजवळ 17 फेब्रुवारी रोजी आपल्याला लूटल्याची तक्रार दाखल करणाऱ्याने कर्ज फेडण्यासाठीच जबरी चोरीची तक्रार दाखल केल्याचा प्रकार उघड़कीस आला आहे.
ठाणे: घोडबंदर रोडवर गायमुखजवळ 17 फेब्रुवारी रोजी आपल्याला लूटल्याची तक्रार दाखल करणाऱ्याने कर्ज फेडण्यासाठीच जबरी चोरीची तक्रार दाखल केल्याचा प्रकार उघड़कीस आला आहे. मोहमद अली शेख या तक्रार दारानेच दिलेल्या उलट सुलट उत्तरांमुळे हा बनाव उघड झाल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक आयुक्त मुकुंद हातोटे यांनी सांगितले.
वसई येथील राहिवाशी असलेला शेख नॉर्थ कंस्ट्रक्शन कंपनीतील मजुरांच्या वेतनाची आठ लाखाची रोकड वसईतील बँकेतून काढ़ल्यानंतर मुंबईत गोवंडीला जाताना दोन वेग वेगळ्या मोटर सायकलवरुन आलेल्या चौघानी आपल्याकडील रोकड़ लुटल्याचा दावा शेख याने कासारवडवली पोलिसांकड़े केला होता. गुन्हे अन्वेषण विभाग घटक 5 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रनावरे यांनी सीसीटीवी फुटेज आणि तांत्रिक विष्लेषणाच्या आधारे शेख याच्याकड़े केलेल्या चौकशीत त्याचे बिंग फुटले. अखेर आपल्यावर झालेल्या 24 लाखांच्या कर्जापैकी काही रक्कम यातून फेडता येईल या कल्पनेतून आठ लाखांच्या लूटीचा बनाव केल्याची कबूली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याच आठ लाखातून काही देणीही त्याने दिल्याचे तपासात उघड झाले आहे. कामगारांच्या पगाराचे पैसे देण्यासाठी नॉर्थ कंस्ट्रक्शन च्या मालकाने त्याला ही रक्कम दिली होती. आता आधीचा लूटीचा गुन्हा रद्द होउन शेख विरुद्धच फसवणुकिचा गुन्हा दाखल होणार असल्याचे हातोटे यांनी सांगितले.